ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि.30- शहरातील विविध महाविद्यालयातून बारावीच्या परिक्षेला बसलेल्या एकूण १५ हजार २११ विद्यार्थ्यांपैकी १४ हजार ३३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पिंपरी चिंचवडमध्ये बारावीचा निकाल ९४.२० टक्के लागला आहे. १०० टक्के निकाल लागलेल्यांमध्ये विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. यामध्ये मुलींचा टक्का अधिक आहे. उत्तीर्ण झालेल्या मुलांची टक्केवारी ३९.१२ तर उत्तीर्ण झालेल्या मुलींची टक्केवारी ४५.८६ इतकी आहे.
एचएससीबोर्ड पुणे विभागाअंतर्गत येणा-या पिंपरी चिंचवड शहरातील महाविद्यालयांमध्ये शिकणा-या बारावीतील विद्यार्थ्यांनी २०१७ च्या निकालात उज्जल यशाची परंपरा कायम राखली आहे. ३१ महाविद्यालयांचा विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे. कला वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांमध्ये १०० टक्के निकाल लागलेल्या महाविद्यालयांमध्ये शिवभूमी विद्यालय,निर्मल बेथेनी,अमृता विद्यालय,डी वाय पाटील महाविद्यालय, सेंट उर्सुला, प्रियदर्शनी या महाविद्यालयांचा समावेश आहे.
विज्ञान शाखेचा बहुतांशी विद्यालयांचा १०० टक्के निकाल लागला आहे. वाणिज्य शाखेचा १०० टक्के निकाल लागलेली शहरातील २० महाविद्यालये आहेत.