पिंपरी :पुणे महानगर परिवहन मंडळाच्या (पीएमपी) पिंपरी-चिंचवड हद्दीतील चार बीआरटी मार्गांत घुसखोरी करणाऱ्या ५७ हजार खासगी वाहन चालकांना वाहतूक पोलिसांनी दंडाचा दणका दिला आहे. गेल्या आठ महिन्यांतील ही कारवाई असून ऑगस्टमध्ये सर्वाधिक १० हजार खासगी वाहनांवर कारवाई केल्याचे स्पष्ट होते.
नागरिकांना जलद वाहतूक सेवा देता यावी म्हणून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर हद्दीत पीएमपीचे सात बस रॅपिड ट्रान्झिट (बीआरटी) मार्ग सुरू केले आहेत. पिंपरी-चिंचवड हद्दीत चार आणि पुणे हद्दीत तीन आहेत. यातून दिवसाला ७५० ते ८०० बस धावतात. दिवसाला ३ ते ४ लाख प्रवासी प्रवास करतात. पण, बीआरटी मार्गात बऱ्याच वेळा खासगी वाहनांची घुसखोरी होते. त्यामुळे पीएमपी बसला अडथळा निर्माण होतो. बऱ्याचदा अपघात होतात. यात काहींचा जीव गेला आहे.
बीआरटी मार्गातील घुसखोरी रोखण्यासाठी वाहतूक पोलिस आणि आरटीओकडून दंडात्मक कारवाई केली जाते. पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाने १ जानेवारी ते २६ ऑगस्टदरम्यान अशा ५७ हजार ७५२ वाहनचालकांवर दंड ठोठावला आहे. तरीही खासगी वाहनांची घुसखोरी सुरूच आहे.
महिना - कारवाई
जानेवारी - ३८६०
फेब्रुवारी - ९६९३
मार्च - ८६९९
एप्रिल - ७०३९
मे - ६२५९
जून - ५८२३
जुलै - ५७७८
ऑगस्ट - १०६०१