राष्ट्रवादीला बळ देण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरपातळीवर बदल; कार्याध्यक्षपदी प्रशांत शितोळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 03:06 PM2018-01-24T15:06:37+5:302018-01-24T15:09:35+5:30
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बदल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कार्याध्यक्षपदी स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत शितोळे यांची नियुक्ती केली आहेत.
पिंपरी : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बदल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कार्याध्यक्षपदी स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत शितोळे यांची नियुक्ती केली आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शितोळे यांची नियुक्ती केली असून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला काँग्रेसमधून भाजपावासी झालेल्यांमुळे महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. गेल्या वर्षभरात भाजपाची अनेक गैरव्यवहाराची प्रकरणे उघडकीस आली. मात्र, त्यांना फारसा प्रखर विरोध झाला नाही. महापालिका निवडणुकीत माजी स्थायी समिती सभापती प्रशांत शितोळे यांना उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करून निवडणूक लढविली. त्यात पराभूत झाले होते. पराभूत होऊनही गेल्या वर्षभरात त्यांनी महापालिकेतील भाजपाच्या गैरकारभाराविषयी आवाज उठविला होता. भाजपातील रिंग, जुन्या बिलांतील तीन टक्केवारीच्या प्रकरणात आवाज उठविला होता. त्यांची दूर करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे, डॉ. शैलेश मोहिते-पाटील आदी उपस्थित होते.
चिंचवड विधानसभेला शह देण्यासाठी
राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रशांत शितोळे तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांनी स्थायी समितीचे सभापतीपद देखील भूषविले आहे. अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. फेब्रुवारी २०१७च्या महापालिका निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करुन अपक्ष निवडणूक लढविली. त्यात त्यांचा पराभव झाला होता. पराभवानंतर ते काही काळ राष्ट्रवादीपासून लांब राहिले. त्यानंतर शितोळे यांनी आता राष्ट्रवादीत सक्रीय होण्यास सुरुवात केली आहे. शितोळे हे एकेकाळी आमदार लक्ष्मण जगताप यांचे निकटवर्तीय होते. जगताप भाजपात गेल्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाला शह देण्यासाठी ही खेळी असल्याचे मानले जात आहे.