Pimpri Chinchwad: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना मिळेना वेळ, नारळ फोडण्यास त्रिमूर्तींचा बसेना मेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 11:40 AM2024-01-10T11:40:28+5:302024-01-10T11:45:01+5:30
प्रशासकीय राजवट लागल्यानंतर पाच महिन्यांत महाविकास आघाडीच्या नेत्यांना, तर त्यानंतर महायुतीच्या नेत्यांना अर्थात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना वेळ मिळत नसल्याने प्रकल्प अद्याप सुरू झालेले नाहीत....
- ज्ञानेश्वर भंडारे
पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेवर दोन वर्षांपासून प्रशासक आहेत. मात्र, विविध विकासप्रकल्प तयार होऊनही श्रेयवादाच्या राजकारणात आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना वेळ मिळत नसल्याने रस्ते सफाई गाड्यांचे, एअर प्युरिफिकेशन फाउंटनचे उद्घाटन रखडले आहे. त्यामुळे रस्ते साफ होत नाहीत. दूषित हवेत शहरवासीयांना राहावे लागत आहे.
प्रशासकीय राजवट लागल्यानंतर पाच महिन्यांत महाविकास आघाडीच्या नेत्यांना, तर त्यानंतर महायुतीच्या नेत्यांना अर्थात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना वेळ मिळत नसल्याने प्रकल्प अद्याप सुरू झालेले नाहीत. पिंपरी-चिंचवड महापालिकेत गेल्या दोन वर्षांपासून प्रशासक आहेत. त्यामुळे सगळ्याच कामांवर प्रशासकीय वर्चस्व आहे. नाट्यसंमेलनाच्या व राजकीय कार्यक्रमांच्या निमित्ताने दोन दिवस मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री व इतर पक्षांचेही ज्येष्ठ नेते शहरात तळ ठोकून होते. मात्र, शहरात प्रकल्पाच्या कामांना वेळ कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या कामांचे राहिले उदघाटन...
यांत्रिकी पद्धतीने रस्ते सफाई, एअर प्युरिफिकेशन फाउंटन, निगडी-किवळे उड्डाणपूल यासह विविध कामे पूर्ण झाली असून ती फक्त उद्घाटनाअभावी पडून आहेत. शहरातील प्रदूषण वाढले तरीही अधिकाऱ्यांना व राजकीय नेत्यांना यांचे गांभीर्य नाही का असा सवाल उपस्थित होत आहे.
आमदारांच्या हट्टामुळे शहर वेठीस
शहरातील आमदारांना पालकमंत्री अजित पवार यांच्याऐवजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या कामाचे उद्घाटन करण्याचे नियोजन आहे. त्यांची मर्जी राखण्यासाठी अधिकारीही वेळ घेण्यासाठी थांबले आहेत. मात्र, या तिघांचीही एकच वेळ मिळत नाही. त्यामुळे विकासकामांच्या उद्घाटनाला मुहूर्ताची तारीख मिळत नाही. आमदारांच्या हट्टापायी शहरवासीयांना वेठीस धरण्याचा प्रकार महापालिकेकडून होत असल्याचे चित्र आहे.