राजाच्या हातात तिजोरीच्या चाव्या पण पैसा वापराविना पडून

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: January 2, 2025 16:24 IST2025-01-02T16:23:30+5:302025-01-02T16:24:58+5:30

- तब्बल ९०० कोटींची भांडवली रक्कम शिल्लक : तीन महिन्यांत उद्दिष्ट साध्य होणार का?

pimpri chinchwad corporation The king has the keys to the treasury but the money lies unused | राजाच्या हातात तिजोरीच्या चाव्या पण पैसा वापराविना पडून

राजाच्या हातात तिजोरीच्या चाव्या पण पैसा वापराविना पडून

ज्ञानेश्वर भंडारे

पिंपरी :
महापालिकेच्या विकासकामांना प्रशासकीय राजवटीत माेठी खीळ बसली आहे. महापालिकेच्या २०२४-२५ च्या अंदाजपत्रकात भांडवली खर्चासाठी १ हजार ४२२ कोटी ३२ लाखांची तरतूद करण्यात आली असताना आर्थिक वर्षाच्या नऊ महिन्यांत फक्त ५२६ काेटी ६३ लाखांचा खर्च झाला आहे. तब्बल ८९५ कोटी २६ लाखांचा निधी शिल्लक आहे. त्यामुळे उर्वरित तीन महिन्यांत ३०० काेटींची रक्कम खर्च करण्याचे स्थापत्य विभागापुढे उद्दिष्ट असणार आहे.

महापालिकेच्या विविध काँक्रीट व डांबरी रस्ते, पूल, उड्डाणपूल, इमारत, शाळा, रुग्णालय, प्राणी संग्रहालय, क्रीडांगण, उद्यान, अर्बन स्ट्रीट डिझाईन, हरित सेतू, मस्त्यालय व इतर विकासकामे, योजना व प्रकल्पांसाठी मोठा भांडवली खर्च केला जातो. तो अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि महसुली खर्चानंतरचा सर्वाधिक मोठा खर्च असतो. निविदा प्रक्रिया राबवून कार्यादेश दिलेल्या कामांसाठी अंदाजपत्रकात तरतूद केलेली असते.

मागील वर्षापासून सुरू असलेली कामे पूर्ण करण्यासाठी अंदाजपत्रकात पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जातो. अशा भांडवली खर्चासाठी २०२४-२५ च्या अंदाजपत्रकात तब्बल १ हजार ४२२ कोटी ३२ लाख रकमेची तरतूद करण्यात आली होती. ती रक्कम वर्षभरात खर्च केली जाणे अपेक्षित आहे. मात्र, ९ महिने उलटले तरी स्थापत्य विभागाकडून फक्त ५२६ कोटी ६३ लाख रुपये खर्च झाले आहेत. हे प्रमाण ३७.०४ टक्के इतके अल्प आहे. अद्याप तब्बल ८९५ कोटी २६ लाखांचा निधी पडून आहे. ही रक्कम पुढील तीन महिन्यांत खर्च न झाल्यास शिल्लक राहणार आहे. त्यानंतर ती रक्कम इतर कामांकडे वळवली जाण्याची शक्यता आहे.

अंदाजपत्रकातील तरतूद

- भांडवली खर्च तरतूद - १ हजार ४२२ कोटी ३२ लाख

- नऊ महिन्यांत खर्च - ५२६ कोटी ६३ लाख

- शिल्लक निधी - ८९५ कोटी २६ लाख

लाेकसभा, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे विकासकामांचा वेग मंदावला हाेता. स्थापत्य विभागाकडून शहरात वेगवेगळी कामे सुरू आहेत. त्या कामांच्या टप्प्यानुसार बिले काढली जातात. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यांत कामे पूर्ण करण्यावर अधिक भर दिला जातो. संबंधित ठेकेदार या महिन्यात मोठ्या प्रमाणात बिले सादर करतात. त्यामुळे ३१ मार्च २०२५ पर्यंत भांडवली खर्च अधिकाधिक खर्ची हाेईल. - मकरंद निकम, शहर अभियंता, महापालिका

Web Title: pimpri chinchwad corporation The king has the keys to the treasury but the money lies unused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.