पिंपरी - दारू पिऊन वाहन चालवणे दोन वाहन चालकांना महागात पडले आहे. एका वाहन चालकाला न्यायालयाने २० हजार रुपयांचा दंड आणि चार दिवसांची साधी कैद, तर दुसऱ्या वाहन चालकाला २० हजार रुपये दंड आणि तीन दिवसांची कैदेची शिक्षा ठोठावली आहे.
पिंपरी वाहतूक पोलिसांनी मागील वर्षी दत्तात्रय आतिश टिपरे (२६, रा. चिखली) आणि राजकुमार गरजूप्रसाद भारती (४५, रा. पिंपरी) या दोघांवर दारू पिऊन वाहन चालविल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण मोटार वाहन न्यायालय शिवाजीनगर येथे सुनावणीसाठी दाखल करण्यात आले. न्यायालयाने दोघांना दोषी ठरवून दत्तात्रय टिपरे याला २० हजार रुपये आर्थिक दंड आणि चार दिवसांची साधी कैद तर राजकुमार भारती याला २० हजार रुपये आर्थिक दंड आणि तीन दिवसांची साध्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे.
वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त बापू बांगर म्हणाले, स्वतःच्या व इतरांच्या जीवाच्या सुरक्षे करिता तसेच न्यायालयीन कार्यवाही टाळण्यासाठी वाहन चालकांनी मद्य प्राशन तसेच इतर कोणत्याही स्वरूपाच्या मादक पदार्थांचे सेवन करून वाहन चालवू नये.