पिंपरी : क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा फायदा होईल, असे आमिष दाखवून कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीची तब्बल एक लाख ५९ हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना शुक्रवारी (दि.२१) ते रविवार (दि.२३) दरम्यान घडली. या प्रकरणी २० वर्षीय तरुणीने दिघी पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि.२५) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही महाविद्यालयीन विद्यार्थिनी असून दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत आहे. ती घरी असताना ती जॉब सर्च करत होती. पार्ट टाइम जॉबच्या एका लिंकवर तिने क्लीक केले. त्यावेळी तिला एका टेलिग्राम वापरकर्त्याने ऑनलाइन संपर्क साधला तसेच क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास अल्पावधीत मोठा फायदा होईल, असे आमिष दाखवून एक लाख ५९ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.