पिंपरी : मनुष्यबळ उपलब्ध होण्याबाबत पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्तालयाकडून शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार शासनाकडून विविध पदांना मंजुरी देण्यात येत आहे. शहरात सध्या आठ सहायक पोलीस आयुक्त कार्यरत असून, आणखी चार पदांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे शहर पोलीस दलातील सहायक आयुक्तांची संख्या १२ होणार आहे. यासह शासनाने बॉम्ब शोधक-नाशक पथकालाही मंजुरी दिली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत रावेत, शिरगाव, म्हाळुंगे (चाकण) या तीन पोलीस चौकींना पोलीस ठाण्यांचा दर्जा दिला होता. या तीनही चौक़्यांना पोलीस ठाणे म्हणून अंतीम मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे स्वतंत्र पोलीस ठाणे म्हणून कामकाज सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच या ठाण्यांसाठी मनुष्यबळ देखील शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एका पोलीस ठाण्याला सरासरी १२० याप्रमाणे तीन ठाण्यांसाठी ३६० पोलीस उपलब्ध होणार आहेत. तसेच शहर पोलीस दलासाठी आणखी एक अपर आयुक्त आणि दोन उपायुक्त अशा तीन पदांना मंजुरी मिळाली. त्यामुळे शहर पोलीस दलात दोन अपर पोलीस आयुक्त तर पाच पोलीस उपायुक्त असणार आहेत.
बॉम्ब शोधक व नाशक पथक सुरू करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. शासनाने या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली. या पथकामध्ये सध्या दोन टीम २४ तास कार्यान्वित राहणार आहेत. प्रशिक्षित कर्मचारी व अधिकारी, स्फोटकाबाबतची माहिती देण्यासाठी अद्यावत साधन सामग्री आणि प्रशिक्षित श्वान पथक यांचा यात समावेश असणार आहे. सध्या पोलीस दलात असलेल्या आणि बॉम्ब शोधक नाशक पथकात काम करण्यास इच्छुक असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आगामी काळात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.