पिंपरी : शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून त्यातून नफा मिळवण्याचे आमिष दाखवले. त्यातून एका व्यक्तीची २९ लाख ६३ हजार रुपयांची फसवणूक केली. मारुंजी येथे ८ डिसेंबर २०२३ ते २५ जानेवारी २०२४ या कालावधीत ही घटना घडली. पराग प्रफुल्ल लोहगावकर (३५, रा. मारुंजी, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मोबाइलधारक, व्हाॅटसअॅप ग्रुप, आयएनडी एसइएस नावाचे अॅप यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लोहगावकर यांच्या फोनवर मोबाइल क्रमांक धारक व्यक्तीने व्हाॅटसअॅप मेसेज केला. त्यानंतर त्यांना रो प्राइज स्टॉक पुलिंग ग्रुप डी ८८ नावाचा व्हाॅटसअॅप ग्रुप जॉईन करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना आयएनडी एसइएस नावाचे अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यातून लोहगावकर यांचा विश्वास संपादन करून ट्रेडिंग करून त्याद्वारे नफा कमावण्याचे आमिष दाखवले. त्यापोटी त्यांच्याकडून २९ लाख ६३ हजार ५९९ रुपये घेत त्यांची फसवणूक केली.