विश्वास मोरे,पिंपरी : विधान परिषदेच्या निवडणुकीत शुक्रवारी पिंपरी-चिंचवड शहराला पाचवा आमदार मिळाला आहे. भाजपचे राज्य सचिव अमित गोरखे हे विजयी झाले आहेत. गोरखे यांच्या रूपाने भाजपला चौथा आमदार मिळणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी निष्ठावान असण्याचा फायदा गोरखे यांना झाला आहे. भाजप नेतृत्वाने मातंग समाजाला प्रतिनिधित्व देत ‘सोशल इंजिनिअरिंग’ साधले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी, चिंचवड आणि भोसरी असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. चिंचवडमधून भाजपच्या अश्विनी जगताप, भोसरीमधून महेश लांडगे विधानसभेचे आमदार आहेत, तर भाजपच्याच उमा खापरे विधान परिषदेच्या आमदार आहेत. पिंपरीतून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे विधानसभेवर निवडून गेले आहेत.
महापालिकेची सूत्रे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि नंतर आ. महेश लांडगे यांच्याकडे गेली. त्यामुळे भाजपच्या इतर नेतृत्वाला संधी मिळत नव्हती. पिंपरी मतदारसंघ अनुसूचित जाती गटासाठी राखीव असून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सामन्यात भाजपला मुसंडी मारता येत नव्हती. पक्षाकडे तशा तक्रारी केल्या जात होत्या. या दोन नेत्यांच्या गटातटाचा फटका पिंपरीला बसत होता.
दरम्यान, २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी पिंपरी-चिंचवड शहरातील गोरखे यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर २०१९ मध्ये राज्यात सत्तांतर झाले. त्यामुळे सर्व महामंडळे बरखास्त झाली. नंतर २०२२ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार जाऊन महायुतीचे सरकार आले. त्यावेळी महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेत्या उमा खापरे यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली. त्यानंतर विधान परिषदेसाठी भाजपने गोरखे यांना संधी दिली होती. आज मतदान आणि मोजणी झाली.
भाजपचे पाच उमेदवार असल्याने तसेच ११ जागांसाठी एकूण बारा उमेदवार होते. त्यामुळे कोणाची वर्णी लागणार आणि कोणाचा पत्ता कट होणार याची उत्सुकता होती. चर्चा रंगली होती. निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आले आहेत. सायंकाळी पिंपरीमध्ये विजयोत्सव साजरा करण्यात आला. तर शहरात विविध भागात विजयाचे फ्लेक्स लागले होते.