पिंपरी चिंचवड, दि. 31 - ऐन गणेशोत्सवाच्या काळात गांधीनगर कामगार भवनाजवळ मंगळवारी रात्री दोन टोळक्यांनी गुंडगिरी, दादागिरीचे वर्चस्व दाखविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यात झालेल्या भांडणात आम्हीच या भागाचे ‘दादा’ आहोत, कोणी मध्ये येऊ नये, असा आरडाओरडा करणा-या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या दोन टोळक्यांमुळे रहिवाशांनी घाबरुन अक्षरश: घराचे दरवाजे बंद करून घेतले. दोन्ही टोळक्यांनी पोलिसांकडे परस्परविरूद्ध तक्रारी दिल्या आहेत.पोलिसांकडे दाखल असलेल्या माहितीनुसार राहुल भिसे (वय २२,रा.गांधीनगर) याने सहा जणांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यात दिनेश शिंगाडे (वय २५) सुनील तेलकर (वय २५), किरण गुरखा (वय २५),सुरेश धोत्रे (वय २४), आकाश बाबावले (वय १९,सर्व रा.खराळवाडी) आणि एक अल्पवयीन मुलगा यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.
फिर्यादीत दिल्यानुसार फिर्यादीचा भाऊ संजय भिसे यास दिनेश शिंगाडे मारहाण करीत होता. फिर्यादी सोडविण्यास गेला त्यावेळी शिंगाडे याने फिर्यादीच्या डोक्यात आणि संजय भिसे याच्या तोंडावर सिमेंट ब्लॉक मारले. त्यांना जखमी केले. भांडण सोडवण्यास आलेल्या काल्या बोचकुरे यास सुनील तेलकर, किरण गुरखा, सुरेश धोत्रे, आकाश बाबावले यांनी लाथा बुक्यांनी मारहाण केली. त्यांना जखमी केले. आम्हीच या भागातील दादा आहोत, मध्ये कोणी पडू नये, त्यांच्याकडू बघून घेऊ असे धमकावत होते.त्यांच्या दहशतीला घाबरून नागरिक सैरभर पळून गेले. घराचे दरवाजे बंद केले. असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तर सुरेश धोत्रे याने चार जणांविरूद्ध पिंपरी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. राहुल सुर्वे (वय २१,रा.गांधीनगर), सुरेश बोचकुरे (वय २३), संजय भिसे (वय २५), राहुल भिसे (वय २२) या आरोपींविरोधात त्याची फिर्याद आहे. त्याच्या फिर्यादीनुसार मित्र आकाश विजय बाबावले लघुशंकेसाठी जात होता. त्यावेळी या आरोपींनी त्यास मारहाण केली असता, फिर्यादी त्या ठिकाणी गेला. संजय भिसे याने फिर्यादी व आकाशच्या डोक्यात पाठीमागून दगड मारला. त्यात ते दोघांना जखमी केले. ‘‘जास्त मस्ती आली आहे का? मस्ती उतरवू का, आम्हीच या परिसराचे दादा आहोत ’’असे ओरडून संजय भिसे आकाशला उद्देशून सांगत होता. त्याच्या आरड्याओरड्याने नागरिक तेथून निघूने गेले. त्यांच्या आवाजाने घरातून कोणीही बाहेर पडले नाही.