पिंपरी : मी आता काय करू...ये आई उठना...कोणी तरी माझ्या आईला उठवा. आता मला कोण ओरडणार...मी अनाथ झालो, काळजाचे पाणी करणारा आक्रोशाने वायसीएम रुग्णालयाच्या परिसरातील रुग्णांच्या नातेवाइकांसह तेथे उपस्थित असलेले पोलिसही स्तब्ध झाले. होर्डिंग पडून झालेल्या अपघातामध्ये अनिता उमेश रॉय (वय ४५ रा. थॉमस कॉलनी, देहूरोड) यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा रोहन हा चुलत बहिणीसोबत आई जखमी झाली आहे, म्हणून तिला पाहण्यासाठी आला होता. मात्र, तिचा मृतदेह पाहून आक्रोश करत होता.
अनिता रॉय या एका ठिकाणी काम करत होत्या. नेहमी प्रमाणे कामासाठी त्या घरून निघाल्या होत्या. त्यांचे पती कामावर गेले होते. संध्याकाळी अचानक रोहनला आई जखमी झाल्याचा फोन आला. त्यामुळे चुलत बहिणीसोबत त्याने तत्काळ वायसीएम रुग्णालय गाठले. मृतदेह ठेवलेल्या खोलीत जेव्हा त्याला आईची ओळख पटवण्यासाठी नेण्यात आले. तेव्हा गोधडीत गुंडाळलेला निपचित पडलेल्या आईचा मृतदेह पाहून रोहनचा स्वत:वरील ताबा सुटला. मी आता काय करू...ये आई उठना...कोणी तरी माझ्या आईला उठवा. माझा एक हात तो तुटून पडला. असे म्हणत तो आक्रोश करत होता. काही जणांनी पकडून त्याला त्या खोलीच्या बाहेर आणले.
मुलीला शोक अनावर
होर्डिंग पडून मृत्यू झालेल्या शोभा विनय टाक यांच्यासोबत त्यांची मुलगी तिची मुले घेऊन राहते. मात्र, आईच्या मृत्यूचा धक्का मुलीला सहन झाला नाही. आता मी काय करू, कोणाच्या आधाराने जगू अशा शोक प्रकट करत होती. तिचे रडणे पाहून वायसीएम परिसरातील इतर रुग्णांचे नातेवाईक हळहळ व्यक्त करत होते.