पिंपरी : तडीपार केलेला तरुण विनापरवाना शहरात आला. ‘‘मी इथला भाई आहे. कोणाला सोडणार नाही,’’ असे म्हणत कोयत्याचा धाकाने दशहत निर्माण केली. पोलिसांनी कोयता जप्त करून तरुणाला अटक केली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने चिंचवड येथील मोहननगरमधील शंकरनगर कमानीजवळ बुधवारी (दि. २४) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ही कारवाई केली.
निहाल महमद शेख (२५, रा. मोहननगर, चिंचवड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलिस अंमलदार आतिष कुडके यांनी याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्तांनी निहाल याला १७ नोव्हेंबर २०२३ रोजी दोन वर्षांच्या कालावधीसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले.
या आदेशाचे उल्लंघन करून निहाल कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता शहरात आला. तसेच कोयता हातात घेऊन मोहननगर भागात फिरून रस्त्याने येणाऱ्या - जाणाऱ्या नागरिकांना कोयता दाखवून दहशत निर्माण केली. मी इथला भाई आहे, कोणाला सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यामुळे दुकानदारांनी दुकानाचे शटर ओढून दुकाने बंद करीत होते. तसेच लोक दार-खिडक्या बंद करीत होते. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करून निहाल याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून कोयता जप्त केला.