नारायण बडगुजर पिंपरी : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात अपयश आल्याने प्रशासनाने लॉकडाऊन लादला आहे. त्यामुळे शहरातील अर्थ व जीवनचक्र ठप्प झाले असून, सर्वसामान्य तसेच मध्यमवर्गीय व्यावसायिक अडचणीत आले आहेत. पिंपरी कॅम्पातील बाजारपेठ तिसºयांदा बंद झाली असून, आता यापुढे लॉकडाऊन नकोच, अशी भूमिका व्यावसायिकांनी घेतली आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पिंपरी कॅम्प येथील मुख्य बाजारपेठेतील दुकाने एक दिवसाआड सुरू करण्याची परवानगी होती. त्यानुसार व्यावसायिकांनी निर्बंधांचे पालन करून दुकाने सुरू केली. मात्र, बाजारपेठ परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने जूनमध्ये शेवटच्या आठवड्यात काही दिवस बाजारपेठ बंद करण्यात आली. मात्र, तरीही या परिसरात तसेच शहरात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. बाजारपेठेतील अनेक दुकाने भाडेतत्वावर आहेत. त्यामुळे या व्यावसायिकांना त्याचे भाडे तसेच कामगारांचे पगारदेखील द्यावे लागत आहेत. वीजबिल, मिळकत कर, पाणीपट्टी यांसह इतर कर आदी खर्च नियमित होत आहे. मात्र, दुकाने सुरू करण्यासाठी दिवसाआड परवानगी आहे. महिन्यातून केवळ १५ दिवस दुकाने सुरू राहत आहेत. त्यात उलाढाल ८५ टक्क्यांनी कमी झाल्याने दररोज केवळ १० ते १५ टक्के व्यवसाय होत आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करावी. लॉकडाऊन हा योग्य पर्याय नाही. वैद्यकीय सुविधा पुरेशा प्रमाणात असल्यास रुग्णसंख्या कमी होण्यास मोठी मदत होईल.- महेश मोटवाणी, अध्यक्ष, रेडिमेड व होजिअरी कापड असोसिएशन
….............
एमआयडीसीतील उद्योग सुरू आहेत. त्यांना लागणारे साहित्य आमच्याकडून जाते. मात्र, दुकाने बंद असल्याने त्यांनाही मालाचा पुरवठा होत नाही. उद्योगही पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाहीत. - देवराज सबनानी, अध्यक्ष, पिंपरी इलेक्ट्रिक असोसिएशन.
…...........
परराज्यातून आलेला माल दुकान व गोदामात उतरवून घेण्यातच वेळ जातो. कमी गाड्या येतात. यातून मालाची टंचाई निर्माण होऊ शकते. प्रशासनाने यावर उपाययोजना करावी.- शाम मेंगराजानी, अध्यक्ष, पिंपरी किराणा अँड ड्रायफ्रुटस असोसिएशन
….........
काही व्यावसायिक नियम व निर्बंधांकडे दुर्लक्ष करतात. त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई करावी, मात्र पूर्ण बाजारपेठ बंद ठेवणे योग्य नाही. सततच्या लॉकडाऊनमुळे व्यावसायिकांची आर्थिक कोंडी झाली आहे.- गोपी आसवानी, अध्यक्ष, मोबाइल विक्रेता असोसिएशन.