पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (एक) विकास ढाकणे यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर महापालिकेमध्ये सहायक आयुक्त, उपायुक्त पद भूषवलेल्या स्मिता झगडे यांची वर्णी लागली आहे. ढाकणे यांची त्यांच्या मूळ विभागामध्ये बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश महाराष्ट्र राज्याचे उपसचिव प्रियांका कुलकर्णी - छापवाले यांनी मंगळवारी (दि. १३) काढले.
अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची १२ फेब्रुवारी २०२१ रोजी भारतीय रेल्वे सुरक्षा सेवेतून महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी प्रतिनियुक्तीने नियुक्ती झाली होती. त्यांनी १५ फेब्रुवारीला पदभार स्वीकारला होता. तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांच्यासोबतच त्यांनी पदभार स्वीकारला होता. राज्यामध्ये सत्ता बदल होताच आयुक्त राजेश पाटील यांची बदली झाली. त्यांच्या जागेवर सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची नियुक्ती झाली. त्यानंतर एक महिन्याच्या आतमध्येच अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांचीही बदली झाली.
ढाकणे यांची महापालिका अतिरिक्त आयुक्तपदावरील प्रतिनियुक्ती संपुष्ठात आणली आहे. त्यांच्या सेवा त्यांच्या मूळ प्रशासकीय विभागाकडे दिल्या आहेत. त्यांच्याजागी महापालिकेच्या उपायुक्त स्मिता झगडे यांची प्रशासकीय कारणास्तव अतिरिक्त आयुक्तपदी नेमणूक केली आहे. स्मिता झगडे या महापालिकेत सहाय्यक आयुक्त, उपायुक्त होत्या. उपायुक्त असताना त्यांनी कर संकलन विभागाची जबाबदारी सांभाळली होती. तसेच कोरोनाच्या काळात त्यांनी ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय आणि महापालिका प्रशासन यामध्ये समनव्य साधण्याचे महत्त्वाचे काम केले होते. त्यानंतर त्यांची एलबीटी (स्थानिक संस्था कर) या विभागात बदली झाली होती. आता त्यांची अतिरिक्त आयुक्तपदी वर्णी लागली आहे.