कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्याने शहरातील नियम कडक केले असून सत्ताधारी भाजपला कोरोनाचे गांभिर्य नसून कोणत्याही नियमांचे पालन केले जात नसल्याचे सोमवारी रात्री आठला दिसून आले. पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडाला होता. नियम मोडणाºया राजकारण्यांवर कोण कारवाई करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोरोनाचा विळखा वाढू लागल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने निर्बंध लादले असून सभागृहात कार्यक्रमांसाठी दोनशे जणांची परवानगी देण्यात आली आहे. तर नाट्यगृहात कार्यक्रमासाठी एक आड एक अशी आसन व्यवस्था करावी. तसेच मास्क अनिवार्य करावा, असे नियम आहेत. मात्र, पिंपळगुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात नियमांचे उल्लंघन होत असल्याचे उघडकीस आले आहे.
महापौरांचाही बेजबाबदारपणानिळू फुले नाट्यगृहाची आसन संख्या ५५० असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमासाठी नियमावली जाहिर केली असून कार्यक्रम घेताना एक आड एक खुर्ची सोडून आसन व्यवस्था करणे अपेक्षीत आहे. तसेच मास्क अनिवार्य केला आहे. मात्र, नाट्यगृहातील सर्वच खुर्च्या फुल्ल झाल्या होत्या. तर उपस्थितांनी मास्क परिधान केलेला नव्हता. या कार्यक्रमास भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. उद्घाटन सोहळा आणि रॅम्प वॉक, गौरव समारंभात एकाही सदस्याने मास्क परिधान केला नव्हता. त्यात महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते उद्घाटन केले. त्यावेळी फॅशन का जलवा या गाण्यावर महापौर उषा ढोरे यांनी रॅम्प वॉक केला. यावेळी महापौरांनीही मास्क परिधान केलेला नसल्याचे दिसून आले. तसेच परिक्षक आणि पहिल्या रांगेतील मान्यवरांनीही मास्क घातलेले नव्हते. यावेळी भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष उमा खापरे, नगरसेविका शारदा सोनवणे, करूणा चिंचवडे आदी नगरसेवक उपस्थित होते.