पिंपरी : महापालिकेचा समावेश स्मार्ट सिटीत झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडची स्थापना झाली आहे. नवनियुक्त संचालक मंडळाची पहिली सभा शनिवारी सकाळी ११ला महापालिका मुख्यालयात होणार आहे. त्या वेळी नवीन सदस्यांना सामावून घेणे, कंपनी सचिव नियुक्त करणे, कंपनी सील, पॅनसिटी आणि एरिया बेस प्रकल्पांसाठी सल्लागार नियुक्तीचा विषय कंपनीच्या विषयपत्रिकेवर असणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटीची पहिली यादी जाही केली. त्या वेळी गुणवत्ता असतानाही स्मार्ट सिटीत समावेश झाला नव्हता. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने पिंपरी-चिंचवडचा समावेश करू, असे आश्वासन दिले होते. महापालिका निवडणुकीनंतर या संदर्भात प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यास मंंजुरी मिळाली. त्यानंतर एसपीव्हीची स्थापना करण्यात आली. पॅनसिटी, एरिया बेस डेव्हलपमेंटचे नियोजन करण्यात आले. कंपनी स्थापनेनंतर पहिली बैठक महापालिकेत होणार आहे. अध्यक्षस्थानी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर असणार आहेत. तसेच संचालक मंडळामध्ये महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हर्डीकर, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती सीमा सावळे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे, केंद्रीय गृहनिर्माण विभागाचे सहसचिव आर. एस. सिंग यांचा समावेश असणार आहे. या वेळी शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद कुटे आणि मनसेचे सचिन चिखले यांची संचालक म्हणून निवड केली आहे. या दोघांचा मंडळात समावेश होणार आहे.कंपनीची पहिली बैठक होणार आहे. कंपनीचे कार्यालय महापालिकेच्या मुख्यालयात असणार आहे. या वेळी सर्व सदस्यांची मते जाणून घेण्यात येणार. स्मार्ट सिटीतील सरकारच्या निकषांनुसार कार्यवाही केली जाणार आहे. प्रमुख प्रस्तावांवर चर्चा होईल. त्यानंतर पॅनसिटी डेव्हलमेंट, एरिया बेस डेव्हलपमेंटच्या आनुषंगिक निविदा प्रक्रियांची कार्यवाही केली जाणार आहे. - श्रावण हर्डीकर, आयुक्त
पिंपरी-चिंचवड : स्मार्ट सिटीची आज बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 2:56 AM