पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील पाण्याची सद्य:स्थिती भविष्यात पाण्याची गरज वाढत आहे. त्यामुळे शहराला ५०० एमएलडी पाणी आणण्यासाठी जलसंपदामंत्री आणि पालकमंत्र्यांना साकडे घातले आहे. पाण्याचे आरक्षण वाढवून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी मंत्र्यांसोबत तातडीची बैठक शुक्रवारी होणार आहे, अशी माहिती महापालिकेचे सभागृहनेते एकनाथ पवार यांनी दिली.गेल्या काही दिवसांपासून शहरातील पाणीनियोजन विस्कळीत झाले आहे. परिणामी त्याचा त्रास नागरिकांना होत आहे. याबाबत सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधी पक्षांनी नाराजी व्यक्त केली होती. ‘लोकमत’नेही प्रशाकीय गोंधळामुळे पाणीकोंडी झाल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल पक्षनेते एकनाथ पवार यांनी घेतली. आज पाणीपुरवठा विभागाची बैठक घेतली.पाणीपुरवठा योजना, मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांना होणारा पाणीपुरवठा, बेकायदेशीर नळजोड व पाणीपुरवठा विभागाकडील अडचणी व त्यावरील उपाययोजनांबाबत बुधवारी अप्पूघर येथील सेक्टर २३ जलशुद्धीकरण केंद्रामध्ये झालेल्या बैठकीस महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता रवींद्र दुधेकर, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, रामदास तांबे, विशाल कांबळे आदी उपस्थित होते.या वेळी पवार यांनी महानगरपालिकेच्या पाणीपुरवठ्याबाबत सद्य:स्थितीचा आढावा घेतला. शहराच्या वाढत्या लोकसंख्येसाठी भविष्यात वाढीव पाण्यासाठी आंद्रा व भामा-आसखेड धरणातून पाणी आणण्याच्या प्रकल्पाचीही विस्तृत माहिती दिली. तसेच, सद्य:स्थितीत चालू असलेली चोवीस पाणीपुरवठा योजना याबाबत माहिती दिली.भामा आसखेडला गती देणारभामा आसखेड आणि आंद्रा धरणातून पाणी आणण्याची योजना रखडली आहे. ही पाणी योजना तातडीने झाल्यास पाणीप्रश्न सुटणार आहे, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘भविष्यातील लोकसंख्या वाढीनुसार पिण्याच्या पाण्याचे नियोजन झाले, तर भविष्यात अडचण येणार नाही. राज्य शासन पातळीवर या योजनांसंदर्भात विविध परवानग्या आणि गती देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या योजनांना गती दिल्यास पाणीटंचाईवर उपाययोजना होऊ शकते. तसेच कपात केलेले पाण्याचे आरक्षण वाढविण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. भविष्यात शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्यासंदर्भात नियोजन केले जाणार आहे.’’२४ तास पाणी योजनापाण्याचा योग्य वापर, पाण्याची गळती कमी करणे याकामी विविध कार्यक्रमांद्वारे नागरिकांमध्ये जागृती करण्याबाबत संबंधितांना पवार यांनी निर्देश दिले. सर्वपक्षीय नगरसेवकांसाठी २४ तास पाणीपुरवठा योजना काय आहे, याची माहिती होण्यासाठी आॅटो क्लस्टर येथे शुक्रवारी कार्यशाळा आहे, असे एकनाथ पवार यांनी सांगितले.शहरात पाणीपुरवठा विस्कळीत1पिंपरी : पवना नदीतील रावेत येथील बंधाºयातील पाण्याची पातळी कमी झाल्याने पाण्याचा उपसा कमी झाला आहे. शहरातील पाणी वितरणामध्ये अडचण निर्माण झाली असल्याचे पाणीपुरवठा व जलनिस्सारण विभागाचे सह शहर अभियंता रवींद्र दुधेकर यांनी सांगितले.2पिंपरी-चिंचवडसाठी पवना धरणातून पाण्याचा पुरवठा होतो. रावेत येथे जलउपसा केंद्रामार्फत पाणी उचलले जाते. सध्या शहरात कोणत्याही परिसरात पूर्ण दाबाने आणि नियमित पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे सर्वच प्रभागांत पिण्याच्या पाण्याच्या तक्रारी सुरू आहेत. उपसा कमी झाल्याने पाणी नियोजन विस्कळीत होऊ शकते, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. कमी प्रमाणात पाणी उपसले गेले तर शहरातील पिण्याच्या पाणी नियोजनावर परिणाम होणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे व महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.3शहरात दिवसातून एकवेळा पाणीपुरवठा होतो. धरण शंभर टक्के भरले असतानाही पिण्याच्या पाण्याची बोंब सुरू झाली आहे. सत्तधारी आणि विरोधकांनी पाठपुरावा करूनही पाणीपुरवठा सुरळीत होण्याऐवजी हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पवना नदीतील रावेत येथील बंधाºयातील पाण्याची पातळी कमी झाल्याने पाण्याचा उपसा कमी झाला आहे, असे पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांतील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार असल्याचा अंदाज पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केला आहे.
पिंपरी-चिंचवड: पाणी आरक्षण वाढीसाठी साकडे: जलसंपदामंत्री, पालकमंत्र्यांसोबत लवकरच घेणार बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 6:59 AM