पिंपरी : महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी नियोजनशून्य कारभार सुरु केला आहे. एकीकडे गणेश मंडळांना परवानगी दिली. तर, दुसरीकडे गणेश विसर्जनाची कुठल्याही प्रकारची सोय न करता गणेश भक्तांच्या भावनांशी खेळ लावला आहे. लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता दोन्ही आयुक्त मनमानी कारभार करीत आहेत, असा आरोप खासदार श्रीरंग बारणे यांनी केला आहे.
बारणे म्हणाले, घरात गणपती बसवा आणि घरातच विसर्जन करा, असा सल्ला महापालिकेने दिला आहे. मात्र, प्लास्टर आॅफ पॅरीसच्या मूर्ती घरात विसर्जित करता येत नाहीत. विसर्जन करण्यासाठी बंदी घालायची होती, तर प्लास्टर आॅफ पॅरीसच्या मूर्तींच्या विक्रीवरही बंदी घालायला हवी होती. शहरात दीड दिवस, पाच दिवस, सात दिवसाचे गणपती असतात. पण विसर्जनाची सोय नसल्याने सर्व गणेशभक्त नाराज झाले आहेत.’
शहरातील गणेश विसर्जन घाटांवर प्रशासनाने पत्रे लावले आहेत. पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त दोघेच निर्णय घेतात. त्याची लोकप्रतिनिधींना कानोकान खबरही दिली जात नाही. शेजारी पुणे महापालिकेने फिरते विसर्जन हौद तसेच प्रभाग कार्यालयावर विसर्जन हौदाची सोय केली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका लोकांच्या भावनांशी खेळत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.---