पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून, आयुक्त श्रावणहर्डीकर हे १५ फेब्रुवारीपर्यंत अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर सादर करणार आहेत. त्यात पिण्याचे पाणी आणि मिळकतकर वाढ काय असतील याबाबत शहरवासीयांना उत्सुकता आहे.महापालिकेने या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पासाठी दहा लाखांपर्यंतची कामे सुचविण्याचे आवाहन केले होते. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, १०१ जणांनी कामे सुचविली आहेत. त्यामध्ये स्थापत्य, विद्युत आणि पाणीपुरवठाविषयक कामे आहेत. या कामांचा अर्थसंकल्पामध्ये समावेश होणार आहे. आगामी वर्षात शून्य तरतूद असलेले सर्व लेखा शीर्षक वगळण्यात येणार आहेत.जेवढ्या रकमेचे काम आहे, तेवढ्याच रकमेची निविदा काढायची, त्यासाठी तेवढीच रक्कम अर्थसंकल्पात ठेवावी, असे आदेश सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत. त्यामुळे वाढीव, सुधारित खर्चाला आळा बसणार आहे. जेवढी कामे करायची तेवढ्याच कामांचा समावेश अर्थसंकल्पात करावा. अनावश्यक कामांचा करू नये. शून्य तरतूद अथवा टोकन हेडला यंदापासून मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे आहे त्याच कामावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर हे मांडत असलेल्या अर्थसंकल्पात नवीन संकल्पना असतील. अर्थसंकल्पाच्या पुस्तकाचा आकारदेखील लहान असणार आहे.अर्थसंकल्पाला होणार उशीरपिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ला होती. त्यामुळे प्रशासनाने अर्थसंकल्प तयार करूनही त्यास मंजुरी मिळाली नव्हती. सत्तांतर झाल्यानंतर भाजपाच्या हाती महापालिकेची सूत्रे आली. त्यानंतर आयुक्तांनी सादर स्थायी समितीला सादर केलेल्या अर्थसंकल्पात अमुलाग्र बदल करण्यात आले. त्यामुळे अर्थसंकल्प मंजुरी, महासभेतील चर्चा यासाठी बराच कालखंड गेला. परिणामी अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करण्याची विलंब लागला.अर्थसंकल्प तयार करण्याचे काम काही महिन्यांपासून सुरू आहे. महापालिकेतील दोन विभागांनी माहिती वेळेत दिलेली नसल्याची नाराजी लेखा विभागाने व्यक्त केली आहे. संबंधित विभागांना पत्रही दिले आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या कामाला उशीर होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका अर्थसंकल्प १५ फेब्रुवारीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 3:37 AM