पिंपरी : महापालिका भवनात आंदोलन करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या भाजप नगरसेविका आशा धायगुडे - शेंडगे यांच्यासह १० जणांची तुरुंगात रवानगी करण्यात आली. पिंपरी पोलिसांनी त्यांना शनिवारी (दि. ११) न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
नगरसेविका आशाताई तानाजी धायगुडे/शेंडगे त्यांच्या समर्थक महिला पूजा अरविंद भंडारी (वय २५), शितल पंकज पिसाळ (वय २१), गौरी कमलाकर राजपाल (वय ३१), आशा जयस्वाल (वय ४०), शीतल महेश जाधव (वय ३६), जयश्री रामलिंग सनके (वय ३०), संध्या रमेश गवळी (वय ४७), स्वप्निल भारत आहेर (वय २१), संजय शंकर पवार ( वय १९, सर्व रा. कासारवाडी, पुणे), अशी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह संजय शेंडगे (वय ४५, रा. कासारवाडी, पुणे) याच्यावरही गुन्हा दाखल केला असून, ते फरार आहेत. सुरक्षा अधिकारी प्रमोद रामकृष्ण निकम (वय ५३, रा. चिंचवड, पुणे) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. ९) फिर्याद दिली.
नगरसेविका आशा शेंडगे कासारवाडी-दापोडी प्रभागाच्या नगरसेविका आहेत. कासारवाडीत भूमिगत गटारांची कामं सुरू असल्यानं रस्ते खोदले आहेत. मात्र, त्यांनी गणेशोत्सवानंतर खोदाई करावी, अशी मागणी करीत काम बंद पाडले होते. तरीही काम सुरूच होते. त्यामुळे नगरसेविका शेंडगे आणि त्यांच्या समर्थकांनी महापालिका भवनात आयुक्तांच्या दालनाबाहेर गुरुवारी (दि. ९) आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, आयुक्तांच्या नामफलकावर शाई फेकून फलकाला काळे फासले. तसेच आयुक्तांना व्हिडिओ काॅन्फरन्सिंगला जाण्यास अटकाव केला. सरकारी कामात अडथळा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पिंपरी पोलिसांनी नगरसेविका शेंडगे यांच्यासह १० जणांना अटक केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.