पिंपरी-चिंचवड : महापालिकेतील कार्यकारी अभियंता जीवन गायकवाड यांचा बुधवारी डेंग्युमुळे मृत्यू झाला. गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालविली.
कार्यकारी अभियंता जीवन गायकवाड यांना डेंग्युची लागण झाली होती. आठ दिवसांपूर्वी त्यांना उपचारासाठी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना बुधवारी दुपारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या अचानक जाण्याने महापालिकेत हळहळ व्यक्त केली जात आहे. जीवन गायकवाड महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झाले होते. स्थापत्या 'इ' क्षेत्रीय कार्यालयात ते कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत होते.
पिंपरी-चिंचवड शहरात स्वाईन फ्ल्यूने कहर माजविला असतानाच डेंग्युने डोके वर काढले आहे. साथीच्या अाजारांनी औद्योगिकनगरी फणफणली आहे. डेंग्युच्या रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.