पिंपरी : कोरोना (कोविड-१९)वर नियंत्रण मिळविण्यासाठी व त्याचा प्रसार रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.कोरोना विरोधातील लढ्यासाठी योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण दिले जाणार असून, एक कोटीचे विमा संरक्षण दिले आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, कोविडसाठी काम करणाऱ्या महापालिकेतील आरोग्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांना विमा कवच देण्यात यावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाने आयुक्त श्रावण हर्डीकर आणि महापौर उषा ढोरे यांना केली होती. त्यानुसार याबाबत बैठक होऊन कोविडसाठी काम करणारे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण दिले आहे. महापालिकेत एकूण साडेसात हजार कायम आणि कंत्राटी कामगार काम करतात. त्यापैकी कोविडसाठी प्रत्यक्षपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या योजनेचे लाभ देण्यात येणार आहे.महापालिकेचे आरोग्य आणि वैद्यकीय विभागातील कर्मचारी कोरोना विरोधातील लढ्यात योगदान देत आहेत. विविध जबाबदारी पार पाडत असताना त्यांचा प्रत्यक्ष कोरोनाग्रस्त रुग्णांशी संपर्क येत आहे. त्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाºयांना सुरक्षा कवच योजनेअंतर्गत कोरोना संसर्ग होऊन दिवंगत झाल्यास त्यांच्या वारसांना राष्ट्रीय स्वास्थ्य योजनेअंतर्गत पन्नास लाख, महापालिका कामगार निधीतून पंचवीस लाख रुपयांचे अर्थसहाय्य व त्यांच्या वारसांना सेवेत सामावून घेण्याच्या योजनेस मान्यता देण्यात आली. तसेच वारस नोकरी न घेतल्यास अतिरिक्त पंचवीस लाख रुपये देणार आहेत.
कोरोना विरोधातील लढ्यात महापालिकेचे कर्मचारी उतरले आहेत. त्यांना विमा संरक्षण देण्यासंदभार्तील आदेश आणि कार्यवाही करण्यात आली आहे. महापालिकेच्यावतीने अतिरिक्त २५ लाख रुपये अथवा महापालिका सभा व महाराष्ट्र शासनाच्या मंजुरीनंतर विशेष बाब म्हणून कायदेशीर वारसास महापालिका सेवेत नियुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेची मुदत ३० मार्चपासून ९० दिवसांपर्यंत असणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीचे अधिकार आयुक्त व कामगार कल्याण निधी समितीला दिले आहेत. - श्रावण हर्डीकर, आयुक्त
महापालिका क्षेत्रातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, कोविडसाठी काम करणाऱ्या महापालिकेतील आरोग्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांना एक कोटीचे विमा कवच देण्यात यावे, तसेच ज्या रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांवर उपचार केले जातात, त्या डॉक्टर, नर्स, परिचारिका, आरोग्य आणि वैद्यकीय विभागाचे कर्मचारी यांना विमा कवचाबरोबरच मास्क, सॅनिटायझर आणि पीपीपी किट देण्यात याव्यात. त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाने केली होती. त्यानुसार महापालिकेने निर्णय घेतला आहे.- अंबर चिंचवडे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघ................