पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पांढरे उंदीर खरेदी करण्यात येणार आहेत. पशुवैद्यकीय विभाग एक उंदीर १६३ रुपयांना खरेदी करणार आहे. त्यानुसार दोन वर्षांमध्ये ११ लाख ८८ हजार रुपये खर्च होणार आहे. प्राणिसंग्रहालयामधील सापांना खाद्य म्हणून उंदीर घेण्यात येणार आहेत. शहरामध्ये महापालिकेचे एकमेव प्राणिसंग्रहालय आहे. मात्र, ते गेल्या सात वर्षांपासून सुशोभीकरण आणि नुतनीकरण करण्यासाठी बंद आहे.
प्राणिसंग्रहालयाला टाळे असल्याने पर्यटन बंद आहे. तेथे असलेल्या प्राण्यांना संग्रहालयातील एका कोपऱ्यामध्ये पिंजऱ्यात तात्पुरत्या स्वरूपात ठेवण्यात आले आहे. त्यांना दररोज खाद्य म्हणून भाजीपाला, फळे, मांस, उंदीर असे खाद्य दिले जाते. सद्य:स्थितीत संग्रहालयामध्ये ५५ विषारी, बिनविषारी साप आहेत. त्यांना खाण्यासाठी दररोज उंदीर दिले जातात.
हे उंदीर पुरविण्यासाठी पशुवैद्यकीय विभागाने १६५ रुपये प्रतिउंदीर दराने निविदा काढली होती. त्यासाठी ३ निविदा प्राप्त झाल्या. त्यात मे. सॅम एंटरप्रायजेसची दोन रुपये कमी दराची १६३ रुपयांची निविदा पात्र ठरली. दोन वर्षांसाठी उंदराचा खर्च ११ लाख ७३ हजार ६०० रुपये इतका आहे. त्याला आयुक्त शेखर सिंह यांनी मंजुरी दिली आहे.
१८८ प्राणी, पक्षी
प्राणिसंग्रहालयात विविध जातींचे विषारी व बिनविषारी ५५ साप आहेत, तर २ मगरी व ५० कासव आहेत. दोन मोर, १५ पोपट, ३७ कॉकपिट, २७ लव्हबर्ड, एक बदक आहे. असे एकूण १८८ साप, पक्षी व सरपटणारे प्राणी आहेत. त्या सापांना खाण्यासाठी उंदीर खरेदी करण्यात येणार आहेत. तसेच तेथील प्राण्यांची देखभाल घेण्यासाठी २ मजूर, मानधनावरील २ ॲनिमल किपर व मानधनावरील २ ॲनिमल क्युरेटर आहेत.