पिंपरी : कोरोना कालखंडात आर्थिक संकट असतानाही पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. महापालिका महापालिकेच्या साडेआठ हजार कर्मचाऱ्यांना ८.३३ टक्के बोनस आणि पंधरा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे, याबाबतची माहिती महापालिकेच्या महापौर उषा ढोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते हे राजू मिसाळ उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महापालिकेत वर्ग एक ते चार सुमारे साडेआठ हजार कर्मचारी आहेत. दिवाळी बोनसबाबत पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघ बरोबर महापालिकेने करार केलेला आहे. त्यानुसार बोनस दिला जातो. कोरोच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे आर्थिक उत्पन्न कमी झाले असताना यंदा बोनस दिला जाणार की नाही, याबाबत उलटसुलट चर्चा होती. मात्र, कर्मचारी महासंघ आणि सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन कामगारांना बोनस दिला जावा, अशी मागणी केली. त्यानंतर आयुक्तांनी बोनस देण्याविषयी प्रशासनाला सूचना केलेल्या आहेत.
महापौर उषा ढोरे म्हणाल्या, ''कोरोनाच्या कालखंडामध्ये महापालिका कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे बोनस देण्यात यावा, अशी सूचना केली होती ही सूचना मान्य झाली आहे.''
सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, ''महापालिका कर्मचाऱ्यांना बोनस मिळावा यासाठी कर्मचारी संघटनेने मागणी केली होती त्यानुसार प्रशासना बरोबर चर्चा झाली. त्यानुसार महापालिका कर्मचाऱ्यांना ८.३३ टक्के बोनस आणि पंधरा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.''
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे म्हणाले, ''महापालिका कर्मचाऱ्यांना बोनस मिळावा, याबाबत महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळे कामगारांची दिवाळी गोड होणार आहे. कोरोना कालखंडात यापूर्वी कामगारांनी चांगले योगदान दिले आहे. यापुढेही कोरोनासंपेपर्यंत योगदान असणार आहे.''