पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीतून आठ जण बाहेर पडणार असून सत्ताधारी भाजपाने पाच वर्षात पन्नास नगरसेवकांना संधी देण्यासाठी स्थायीतील विद्यमान दहा सदस्यांचे राजीनामे घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप महापालिकेत ठाण मांडून बसले आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीमध्ये १६ सदस्य आहेत. यामध्ये भाजपाचे दहा, राष्ट्रवादीचे चार, शिवसेनेचा एक तर अपक्ष एक असे १६ सदस्य आहेत. सार्वत्रिक निवडणुकीनंतर त्यातील पहिले आठ सदस्य पहिल्या वर्षानंतर निवृत्त होतात. ती नावे चिठ्ठी काढून निश्चित केले जातात. बुधवारच्या स्थायी सभेत सदस्यांचा 'ड्रॉ' काढण्यात येणार आहे. परंतु, सभा दुपारी दोन वाजता होणार होती. ती अद्याप सुरू झाली नसून स्थायीतील भाजपा नगरसेवकांमध्ये चलबिचल सुरू आहे. भाजपातील काही सदस्य राजीनामे देण्यास उत्सुक नसल्याचे कळते. त्यामुळेच सभा सव्वादोन नंतरही सुरू झाली नसल्याची चर्चा महापालिका वतुर्ळात सुरू आहे.
कोणाचा होणार पत्ता कट?, उत्सुकता शिगेला भाजपातर्फे दहा सदस्यांना संधी स्थायी समितीमध्ये अध्यक्षा सीमा सावळे, आशा शेंडगे, लक्ष्मण उंडे, कुंदन गायकवाड, प्रा. उत्तम केंदळे, उषा मुंडे, माधुरी कुलकर्णी, हर्षल ढोरे, निर्मला कुटे, कोमल मेवाणी (भाजपा), राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनुराधा गोफणे, वैशाली काळभोर, मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ, शिवसेनेचे अमित गावडे आणि अपक्षांचे गटनेते कैलास बारणे हे सदस्य आहेत. त्यापैकी आठ जणांची चिठ्ठी निघेल. त्यानंतर नवीन आठ सदस्यांची फेब्रुवारी महिन्याच्या महासभेत निवड केली जाणार आहे. सत्ताधारी भाजपाने स्थायी समितीत पाच वर्षांत दरवर्षी दहा याप्रमाणे पन्नास नगरसेवकांना संधी देण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपाकडून विद्यमान दहा सदस्यांना स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा द्यायला लावून नवीन दहा सदस्यांना संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे कोण समितीत येणार आणि कोणाचा पत्ता कट होणार याबाबत उत्सुकता आहे.