पिंपरी : महापालिका रुग्णालयांचे सक्षमीकरण करण्यात येणार असून महापालिकेची चार रुग्णालये चोवीस तास सुरू राहणार आहेत. महापालिकेच्यावतीने संत तुकारामनगर येथील वायसीएम रुग्णालय चोवीस तास सुरू असते.
थेरगाव रुग्णालयात दोनशे बेड्स, जिजामाता रुग्णालयात १३० बेड्स, ह.भ.प.कै. मल्हाराव कुटे रुग्णालय आकुर्डीत १३० बेड्स व भोसरी रुग्णालयात शंभर बेड्स नव्याने चार रुग्णालये चोवीस तास सुरू असणार आहे. तसेच शहरामध्ये २५ ठिकाणी जिजाऊ क्लिनिक, थेरगाव येथे कॅन्सर रुग्णालय, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पीजी इन्स्टिट्यूट येथे एम.बी.बी.एस. कॉलेज सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.
वीस टक्के अधिक दर
महापालिकेचे ८ रुग्णालये आणि २९ दवाखान्यांमधून शहरातील तसेच शहराच्या हद्दीबाहेरील रुग्णांना उपचारार्थ आरोग्य सेवा सुविधा पुरविल्या जातात. पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्य असल्याचा पुरावा सादर न करणाऱ्या रुग्णांकडून प्रत्येक वैद्यकीय शिर्षातील आंतररुग्ण बिलामध्ये महापालिकेमार्फत सध्याच्या दरानुसार २० टक्के जादा फी आकारली जाणार आहे.
महापालिकेच्या आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे शासनाकडील नियमानुसार (ससून रुग्णालय व इतर शासकीय रुग्णालयाप्रमाणे) महापालिका दवाखाने आणि रुग्णालयामध्ये दर आकारणी करणे गरजेचे आहे. त्यानुसार नवीन धोरण केले असून महापालिका महासभेने मान्यता दिलेली आहे.
-राजेश पाटील, आयुक्त तथा प्रशासक