पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीचे अजित पवारांना समर्थन; शरद पवार समर्थक गप्प, कार्यकर्ते संभ्रमात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 12:50 PM2023-07-04T12:50:34+5:302023-07-04T12:55:02+5:30
नवे राजकीय समीकरण : शरद पवार समर्थक गप्प, पदाधिकारी व कार्यकर्ते संभ्रमात...
पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपा-शिवसेनाप्रणीत राज्य सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. या घटनेला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा पाठिंबा नाही, तरीही पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी व नगरसेवकांनी नव्याने उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवार यांना भेटून शुभेच्छा दिल्या. मात्र, शहरातील शरद पवार समर्थक बोलण्यास तयार नसल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत. शहरातील माजी आमदार विलास लांडे यांनीही वेट ॲंड वॉचची भूमिका घेतली आहे.
पिंपरी- चिंचवड महापालिकेत पूर्वी काँग्रेस, त्यानंतर राष्ट्रवादीचे १५ ते २० वर्षे वर्चस्व होते. २०१७ च्या निवडणुकीत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांच्यामुळे भाजपला एकहाती सत्ता मिळविली. पिंपरी- चिंचवडच्या राजकारणावर तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पकड होती. १९९१ पासून दादांनी या महापालिकेवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले. त्यामुळे आमदार कोणास करायचे आणि महापौर, उपमहापौर, स्थायी समिती निवडीपासून सर्वकाही दादाच पाहायचे. मात्र, तरीही शहरात दादा आणि साहेब असे दोन गट कार्यरत होतेच. दोन्हीही गट एकमेकांवर कुरघुड्यांचे राजकारण आजही करीत आहेत. आता राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याने कोण पदाधिकारी व नगरसेवक हे साहेब की दादा कोणाचे समर्थक करणार, याविषयी उत्सुकता आहे.
साहेबांचे शिलेदार गप्प...
भोसरीचे माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, सातबा काटे, भिकू वाघेरे, दिवंगत माजी महापौर नाना शितोळे, माजी महापौर तात्या कदम, आमदार विलास लांडे, वसंत नाना लोंढे, माजी महापौर संजोग वाघेरे, श्यामराव वाल्हेकर, अनिता फरांदे, शमीम पठाण हे साहेबांचे समर्थक मानले जात. मात्र, यापैकी कोणीही थेट भूमिका जाहीर करण्यास तयार नाही.
दादांचे समर्थकांची थेट भूमिका
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, मधुकर पवळे, आझम पानसरे, सुरेंद्रदेव महाराज, आमदार अण्णा बनसोडे, आर. एस कुमार, योगेश बहल, मंगला कदम, अजित गव्हाणे, दत्ता साने, ज्ञानेश्वर भालेराव, अपर्णा डोके, विलास नांदगुडे, नाना थोरात, डॉ. वैशाली घोडेकर, डब्बू आसवानी, राजू मिसाळ, प्रशांत शितोळे, जगदीश शेट्टी, भाऊसाहेब भोईर, नाना काटे, मोरेश्वर भोंडवे, मयूर कलाटे, तुषार कामठे हे दादांचे समर्थक मानले जातात. त्यापैकी काहींचे निधन झाले आहे, तर काहींनी भाजपात प्रवेश केला आहे. काही दादा समर्थकांनी थेट भूमिका जाहीर केलीय.