पिंपरी : थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळा ६०/१ मुले या शाळेत शिक्षिका आणि सफाई कर्मचाऱ्याने १२ वर्षीय विद्यार्थ्याला पडदा काढण्यासाठी शिडीवर चढवले. यामध्ये विद्यार्थी गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी (७ एप्रिल) सकाळी सव्वादहा वाजताच्या सुमारास घडली.
मनोज भीमराव म्हस्के (३८, थेरगाव) यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार २२ वर्षीय महिला शिक्षिका आणि सफाई कर्मचारी गणेश तांबे (३८, रहाटणी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या शिव शक्ती फाउंडेशन संचालित स्पंदन बाल आश्रमात राहणारा १२ वर्षीय मुलगा थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळा ६०/१ या शाळेत शिकत आहे. त्याला शाळेतील शिक्षिका आणि सफाई कर्मचारी तांबे यांनी शाळेतील पडदा काढण्यासाठी शिडीवर चढवले. शिडीवरून पाय घसरून मुलगा खाली पडला असता त्याच्या दोन्ही हाताला फ्रॅक्चर होऊन तो गंभीर जखमी झाला.