पिंपरी : महापालिका परिसरात बेकायदेशीररीत्या वृक्षतोड सुरू आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने स्वतंत्र पथके नेमली आहे. या पथकांद्वारे शहरातील विविध ठिकाणांची पाहणी करून बेकायदेशीररीत्या वृक्षतोड करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती उद्यान विभागाचे उपआयुक्त रविकिरण घोडके यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना वृक्षतोडीच्या घटना वारंवार घडत आहेत. शहराच्या विविध भागात जाहिरात फलकांसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे, असे महापालिकेच्या उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाच्या निदर्शनास आले आहे. खासगी तसेच महापालिकेची अखत्यारित असलेली झाडे विनापरवाना तोडली जात असून, या वृक्षतोडीवर आळा घालण्यासाठी महापालिकेने कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.
जाधववाडी, आकुर्डीत वृक्षतोड
पी.सी.एम.टी चौक, भोसरी, देहू आळंदी रोड, गवळी माथा येथील घनकचरा हस्तांतरण प्रकल्पाच्या मागील बाजूस तसेच एमआयडीसी भोसरी येथील कटफास्ट कंपनी एफ-२ ब्लॉक वंडरकार शोरूमजवळ, जाधववाडी चिखली येथील साईराज पब्लिसिटी फॅशन दुकानासमोर, आकुर्डी येथील तुळजा भवानी मंदिरासमोर आणि डुडुळगाव रांजनगाव पार्क या ठिकाणी जाहिरात फलक लावण्यासाठी बेकायदेशीर वृक्षतोड केल्याचे आढळून आले आहे.
विनापरवाना वृक्षतोड होत असल्याबाबत तक्रारी आल्यानंतर उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाच्या वतीने संबंधित जाहिरात फलक मालकांवर महाराष्ट्र झाडे तोडणे नियमांतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई केली जाईल.
-रविकिरण घोडके, सहायक आयुक्त