- नारायण बडगुजर
पिंपरी : कोरोना महामारीतून सावरत असताना पिंपरी-चिंचवड पोलीस आणि शहरवासीयांसाठी २०२२ हे वर्ष अनेक घडामोडींनी स्मरणात राहिल असे ठरले. तत्कालीन विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर चप्पल फेक आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरणामुळे राजकीय ‘गरमागरमी’ झाली. तसेच शहर पोलीस दलातही चौकशी, संलग्न करणे, उचलबांगडी करणे, निलंबन अशा कारवाया वरिष्ठांकडून करण्यात आल्या. त्यामुळे पोलिसांनी धसका घेतला होता.
राजकीय आंदोलन अन् पोलिसांचा लाठीमार
राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ६ मार्च २०२२ रोजी शहरात विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी पूर्णानगर, चिंचवड येथे फडणवीस यांच्या ताफ्यावर अज्ञात व्यक्तीने चप्पल फेकली. त्यामुळे शहरातील आणि राज्यातील राजकारण तापले. आरोप-प्रत्यारोप झाले. तसेच याचवेळी जमावबंदीचे आदेश झुगारून फडणवीस यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत गोंधळ घालण्यात आला. त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यादरम्यान असलेल्या सुरक्षा व्यवस्थेवरूनही यावेळी प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
खून, गोळीबाराच्या घटनांनी हादरले शहर
सांगवी येथे गेल्या वर्षी गोळ्या झाडून भर चौकात एकाचा भर दिवसा खून करण्यात आला होता. त्यानंतर यंदाही गोळीबार करून दहशत पसरविण्याचे प्रकार समोर आले. मुळशी तालुक्यातील नेरे दत्तवाडी येथे २० ऑक्टोबर रोजी जमिनीच्या वादातून गोळीबार करण्यात आला. चिंचवड येथे २ डिसेंबरला एकाचा निर्घृण खून करून गोळीबार करण्यात आला. त्यानंतर लगेचच ६ डिसेंबरला पिंपरी येथे तीन ठिकाणी गोळीबाराची घटना घडली.
एका वर्षात तीन पोलीस आयुक्त
पिंपरी-चिंचवड शहराला यंदा तीन पोलीस आयुक्त लाभले. तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची एप्रिलमध्ये बदली झाली. त्यानंतर अंकुश शिंदे यांनी पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली. आयुक्त शिंदे यांनी स्वत: लाॅटरी सेंटरवर कारवाई केली. यात त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांना संलग्न केले. चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरणातही काही अधिकाऱ्यांना निलंबित व संलग्न केले. त्यामुळे शहर दलातील पोलिसांनी धसका घेतला. मात्र आठ महिन्यांतच अंकुश शिंदे यांची बदली झाली. त्यानंतर अपर पोलीस महासंचालक विनय कुमार चौबे यांनी पोलीस आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत.