पिंपरी : मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगारी टोळीच्या प्रमुखासह एका सदस्याला बेड्या ठोकण्यात आल्या. दोन्ही आरोपी मोस्ट वाँटेड होते. पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने ही कामगिरी केली.
गुन्हेगारी टोळीचा प्रमुख सुरेश उर्फ बॉबी विलास यादव (वय ३०, रा. पांढरकरचाळ, आकुर्डी, मूळगाव कशेडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) आणि टोळीचा सदस्य कल्पेश संदीप पवार (वय २४, रा. पंचतारानगर, आकुर्डी, मूळगाव कसबा, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यादव याच्या गुन्हेगारी टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच आकुर्डी येथे आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला मारहाण केली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गून्ह्यात आरोपी यादव व आरोपी पवार हे फरार होते.
गुंडा विरोधी पथकाने रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील आंबेगाव, सनगर येथील दुर्गम डोंगराळ भागात पायपीट करून आरोपी यादव व पवार यांना पकडले. आरोपी यादव याच्या विरोधात निगडी, चिंचवड व चाकण या पोलीस ठाण्यांमध्ये विविध १३ गुन्हे दाखल आहेत. तर आरोपी पवार याच्या विरोधात पिंपरी, वाकड व निगडी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत.
सहायक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर व श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हरिष माने, पोलीस कर्मचारी हजरत पठाण, प्रवीण तापकीर, गणेश मेदगे, विजय तेलेवार, रामदास मोहिते, शुभम कदम, राजेंद्र शेटे, नागेश माळी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.