पिंपरी : नागरिकांना तत्काळ पोलिसांशी संपर्क साधता यावा तसेच त्यांना त्वरित प्रतिसाद देता यावा म्हणून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे ट्विटर हँडल पुन्हा ॲक्टिव करण्यात आले आहे. त्यामुळे वैयक्तिक स्तरावरील अडचणी ते विविध समस्यांबाबत पोलिसांकडे नागरिकांना गाऱ्हाणे मांडता येणार आहे. तसेच पोलिसांनाही जनजागृतीसह विविध माहिती नागरिकांपर्यंत सहज पोहचविण्यास मदत होणार आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय १५ ऑगस्ट २०१८ रोजी कार्यान्वित झाले. त्यानंतर आयुक्तालयाचा इमेल आयडी तसेच स्वतंत्र वेबसाईट तयार करण्यात आली. त्यानंतर ट्विटर हँडल देखील कार्यान्वित करण्यात आले. मात्र, काही तांत्रिक कारणास्तव तसेच अपुऱ्या मनुष्यबळामुळे ट्विटर हँडलच्या वापराकडे दुर्लक्ष झाले. काही नागरिकांनी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानंतर आयुक्त चौबे यांनी ट्विटर हँडल पुन्हा ॲक्टिव करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ट्विटर हँडल ॲक्टिव करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना त्यांचे मत, सूचना, समस्या मांडण्यास मदत होणार आहे.
‘कोअर टीम’ तयार
पिंपरी-चिंचवड आयुक्तालय स्तरावर सोशल मीडिया सेल कार्यान्वित केला आहे. पोलीस उपायुक्तांच्या मार्गदर्शनात या सेलचे कामकाज होईल. त्याअंतर्गत आयुक्तालयाच्या ट्विटर हँडल ॲक्टिव राहणार आहे. त्यासाठी स्वतंत्र अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले असून तज्ज्ञांची मदत घेऊन ‘कोअर टीम’ तयार केली आहे. त्यामुळे हँडलवरून नागरिकांना पोलिसांकडून ‘क्विक रिस्पाॅन्स’ मिळणार आहे. तसेच थेट उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी नागरिक जोडले जाणार आहेत. https://twitter.com/PCcityPolice असे पोलीस आयुक्तालयाचे ट्विटर हँडल आहे.
हँडलच्या माध्यमातून लोकांची प्रायोरिटी जाणून घेत कार्यवाही सुरू करणार आहे. नागरिकांना वैयक्तिक स्तरावरील तसेच वाहतूक व इतर समस्या, सूचना, मत मांडता येणार आहे. त्यांच्या समस्यांचे निवारण करणे तसेच फोटो, व्हिडिओ व इतर माहितीचे सहज आदानप्रदान करता येईल. जनजागृती करता येईल. लोकांना पोलिसांपर्यंत आणि पोलिसांना लोकांपर्यंत पोहचण्याचे हे सहज उपलब्ध झालेले माध्यम आहे.
- विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड