- नारायण बडगुजर
पिंपरी : शहर पोलिस दलासाठी संदेश वहनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडणाऱ्या बिनतारी संदेश वहन विभागाबाबत (वायरलेस) पिंपरी-चिंचवडपोलिस आयुक्तालय प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येते. पिंपरी येथील पोलिस वसाहतीची इमारत जीर्ण असून, कधीही कोसळू शकते, अशा अवस्थेत आहे. असे असतानाही आयुक्तालय प्रशासनाने या पडक्या इमारतीत ‘वायरेलस’चा भांडार विभाग थाटला आहे. या विभागाचे स्थलांतर करावे, अशी मागणी ‘वायरलेस’कडून होत आहे. मात्र, आयुक्तालय प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत १८ पोलिस ठाणी, वाहतूक शाखा, मुख्यालय, नियंत्रण कक्ष यासह विविध विभाग, शाखा यांच्यासाठी अत्यावश्यक असलेल्या ‘वायरलेस’ विभागाकडे दुर्लक्ष होत आहे. या विभागासाठी स्वतंत्र कार्यालय, प्रशस्त भांडार विभाग असणे आवश्यक आहे. आयुक्तालय कार्यान्वित झाल्यानंतर सुरुवातीला पिंपरी पोलिस ठाण्याजवळील इमारतीत ‘वायरलेस’चा भांडार विभाग होता. मात्र, काही वर्षांपूर्वी पिंपरी पोलिस वसाहतीमधील जीर्ण इमारतीच्या तळमजल्यावरील एका घरात वायरलेसच्या भांडार विभागाचे स्थलांतर केले.
शहरातील पहिले पोलिस ठाणे असलेल्या पिंपरी पोलिस ठाण्याला लागून १९८५ ते १९९० या कालावधीत पोलिस वसाहत उभारली. यात उपनिरीक्षकांसाठी सहा सदनिकांची एक इमारत आहे. कर्मचाऱ्यांसाठी ९६ सदनिकांच्या तीन इमारती आहेत. यात स्वयंपाक खोलीसह दोन खोल्यांची (वन आरके) सदनिका आहेत. या वसाहतीला ३५ वर्षे झाली असून, येथील धोकादायक झालेल्या इमारती राहण्यास योग्य नाहीत, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमधून समोर आले आहे. त्याच अनुषंगाने पोलिस मुख्यालय प्रशासनानेदेखील या इमारतीत वास्तव्यास असलेल्या पोलिसांच्या कुटुंबांना नोटीस बजावली आहे.
इमारत धोकादायक असतानाही ‘वायरलेस’चा भांडार विभाग तेथे स्थलांतरित करण्याचे नेमके काय कारण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या भांडार विभागात वायरलेसची महत्त्वाची कागदपत्रे तसेच वायरलेस संच, त्याचे साहित्य, वाॅकीटाॅकी, मेटल व सिक्युरिटी डिटेक्टर, बॅटऱ्या, चार्जर, प्रिंटर, काॅम्प्युटर व त्याची सामुग्री, इलेक्ट्राॅनिक व इलेक्ट्रिक साहित्य असते. या साहित्याची नोंद ठेवणे, त्याची आवक-जावक याबाबतचे कामकाज भांडारचे कर्मचारी करतात.
...तर ‘वायरलेस’ होणार विस्कळीत
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या संदेश वहनासाठीचा ‘रिपिटर’ पिंपरी पोलिस वसाहतीमधील धोकादायक इमारतीत आहे. इमारतीची पडझड झाल्यास भांडार विभागातील सामग्री व इतर साहित्यासह या ‘रिपिटर’च्याही नुकसानाची शक्यता आहे. त्यामुळे ‘वायरलेस’ यंत्रणा विस्कळीत होऊ शकते.
आयुक्तालय प्रशासन ढिम्म
पोलिस आयुक्तालय प्रशासनाकडे याबाबत सातत्याने मागणी करण्यात आली आहे. मात्र, प्रशासन याबाबत ढिम्म आहे. वायरलेस विभागासाठी व त्यांच्या भांडार विभागाला नवीन कार्यालय किंवा सुस्थितीतील इमारतीत स्थलांतरित करण्याबाबत कोणतीही हालचाल होत असल्याचे दिसून येत नाही.