पिंपरी : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी (Ashadhi Wari 2024) प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असणार आहे. यात पालखी मार्गावर तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणी टेहळणी मनोरे (टाॅवर) उभारण्यात येणार आहेत. यावरून पालखी सोहळ्यातील गर्दीवर पोलिसांचा ‘वाॅच’ राहणार आहे.
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी (Sant Tukaram Maharaj Palkhi) २८ जून रोजी तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी (sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) सोहळा २९ जून रोजी प्रस्थान करणार आहे. या पालखी सोहळ्यासाठी राज्यातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपर्यातून लाखो भाविक येत असतात. वारीच्या काळात गर्दीचा गैरफायदा घेत अनेक चाेरटे या गर्दीत मिसळून मोबाइल, पाकीट, सोन्याचे दागिने लंपास करतात. यामध्ये महिला चोरट्यांचाही सहभाग असतो. ही बाब लक्षात घेऊन साध्या आणि वारकर्यांच्या वेशातही पोलिस पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
गर्दीमध्ये एखादा संशयित दिसला की त्याला लगेच ताब्यात घेण्यात येणार आहे. तसेच परिसरातील रेकॉर्डवरील गुंडांवरही प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. वारीवर लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच अनेक ठिकाणी टेहळणी मनोरे (टॉवर) उभारले आहेत. या टाॅवरवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तसेच पोलिसांकडून देखील गर्दीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
स्थानिक पोलिस ठाण्यासह गुन्हे शाखेच्या पोलिसांनाही बंदोबस्ताच्या सूचना केल्या आहेत. गर्दीत कोणी संशयित व्यक्ती आढळल्यास तत्काळ ताब्यात घेण्यात येणार आहे. त्यासाठी गर्दीमध्ये साध्या वेशातील पोलिस देखील राहणार आहेत. - संदीप डोईफोडे, पोलिस उपायुक्त
असा आहे पोलिस बंदोबस्त
पोलिस उपायुक्त : ६सहायक पोलिस आयुक्त : १७पोलिस निरीक्षक : १०३सहायक निरीक्षक /उपनिरीक्षक : ३४५अंमलदार : ३,४५९आरसीपी पथक : ५एसआरपीएफ : ३ कंपन्यास्ट्रायकिंग फोर्स : ३जलद प्रतिसाद पथक (क्यूआरटी) : १एनडीआरएफ तुकडी : २ बाॅम्ब शोधक, नाशक (बीडीडीएस) पथक : ४