पिंपरी : स्मार्ट सिटी आणि स्वच्छता भारत अभियानात राज्यात प्रथम क्रमांक मिळाल्यानंतर पिंपरी-चिंचवडच्या बिरुदावलीत आणखी एक भर पडली आहे. प्रॉपर्टी कन्सल्टंट असलेल्या एका खासगी संस्थेने देशातील जगण्यासाठी सुयोग्य शहरांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा पाचवा क्रमांक आला आहे.देशातील अत्यंत वेगाने विकसित होणारे शहर म्हणून पिंपरी-चिंचवडकडे पाहिले जाते. गेल्या ३० वर्षांत येथील लोकसंख्या २२ लाखांवर पोहोचली आहे. झपाट्याने वाढणा-या लोकसंख्येमुळे देशातील अनेक शहरे भकास झाली आहेत. हे सर्व घडत असताना दुसरीकडे मात्र, काही शहरांचे नियोजन अतिशय योग्यरीत्या झाल्याचे दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून या संस्थेने देशातील सुनियोजित अशा शहरांची एक स्पर्धा घेतली होती.जगण्यासाठी सुयोग्य शहरांच्या या स्पर्धेत १० निकष ठेवले होते. त्यात नियोजन, दळणवळण सुविधा, मूलभूत सुविधांचे प्रमाण, दैनंदिन गरजा, विश्रांती व मनोरंजन, स्मार्ट प्रशासन, सुरक्षितता व निर्भयता, नोकरीच्या संधी, पर्यावरण व शाश्वत विकास, बांधकाम क्षेत्राची कामगिरी, भविष्याचा विस्तार, दृष्टिकोन हे निकष ठेवण्यात आले होते. या निकषांत पहिल्या पाचमध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा क्रमांक लागला आहे.पिंपरी-चिंचवड हे शहर अत्यंत वेगाने विकसित झालेले शहर आहे. आता या शहराचा समावेश स्मार्ट सिटीत झाला आहे. स्वच्छ भारत अभियानातही राज्यात पहिला आणि देशात नववा क्रमांक मिळाला होता. त्यानंतर सुयोग्य शहराच्या यादीत शहरास पाचवा क्रमांक मिळाला आहे, ही भूषणावह बाब आहे. आपले शहर रहिवाशांसाठी सर्वोत्तम शहर आहे, यावर मोहोर उमटविली आहे. - श्रावण हर्डीकर,महापालिका आयुक्त
देशातील सुयोग्य शहरांच्या यादीत पिंपरी-चिंचवड पाचव्या स्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 6:55 AM