पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात ६५ टक्के पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा जूनअखेरपर्यंत पुरणार आहे. पाऊस लांबल्यास पिंपरी-चिंचवडकर यांना पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे.
मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा केला जातो. धरणातून नदीद्वारे रावेत येथील उपसा केंद्रात पाणी येते. तिथून पाणी उपसून निगडी प्राधिकरणातील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केली जाते. त्यानंतर जलवाहिनीच्या माध्यमातून वेगवेगळ्या भागांमध्ये असणाऱ्या पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी सोडले जाते व तिथून जलवाहिनीद्वारे विविध भागांमध्ये नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गेल्या तीन वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. पाचशेच्या चाळीस एमएलडी पाणी उचलले जाते व त्यावर प्रक्रिया करून नागरिकांना पुरविले जाते. पाणी उचलण्याची क्षमता कमी असल्याने मुबलक पाणी असूनही त्याचा पुरवठा करता येत नाही.
गेल्या वर्षी पवना धरणामध्ये ६५.३५ टक्के पाणीसाठा होता यावर्षी ६५ टक्के पाणीसाठा आहे. हा पाणीपुरवठा जूनअखेरपर्यंत पुरेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. तसेच भामा आसखेड स धरणातून पाणी आल्यानंतर अधिक पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे समाविष्ट गावातील पाणीटंचाईची समस्या कमी होणार आहे.
पवना धरणाचे अभियंता राजेश बरिया म्हणाले, पवना धरणामध्ये सध्या ६५ टक्के पाणीपुरवठा आहे. पाणीसाठा आहे हे पाणी आपल्याला जूनअखेरपर्यंत तसेच जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पुरेल. जून, जुलैमध्ये पाऊस होत असल्याने सध्याचा पाणीसाठा पुरेसा आहे.