ऑनलाइन लोकमत
पिंपरी चिंचवड, दि. 1- चलनातून बाद झालेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा असलेली एकुण १ कोटी ३६ लाख २६ हजार रुपयांची रक्कम घेऊन जाणा-या संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. आयकर खात्याच्या अधिका-यांना याबाबतची माहिती देण्यात आली. आयकर खात्याच्या अधिका-यांनी रक्कम जमा केली असून या तिघांना आयकर खात्याच्या कार्यालयात हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे. त्यांच्याकडे या रकमेबाबत चौकशी केली जणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही होईल, असे दिघी पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री दिघी पोलीस गस्त घालत होते. त्यावेळी दिघी मॅगझीन चौकात एक मोटार संशयास्पदरित्या परिसरात फिरत होती. त्यामुळे गस्तीवरील पोलिसांना शंका आली. त्यांनी मोटारीतील तरूणांना हटकले. मोटार थांबवावयला सांगून पोलिसांनी मोटारीची तपासणी केली. त्यावेळी मोटारीत चक्क सव्वा कोटींची तेसुद्धा चनलातुन बाद झालेल्या हजार, पाचशेच्या नोटांची बंडले आढळले.
१ कोटी ३६ लाख २६ हजार रुपयांची रोकड मोटारीत आढळून आली. पोलिसांनी चालकासह तिघांना ताब्यात घेतले. चालक भोसरी येथील रहिवाशी असून अन्य दोघे त्या परिसरातील राहाणारे नाहीत. त्यांच्याकडील रोकड जप्त करुन त्यांना आयकर विभागाकडे हजर राहण्याची नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. जुन्या नोटा बदलुन घेण्यासाठी ते मोटारीतून जात होते. या कामानिमित्त जात असताना, याच मार्गावर त्यांना एकजण त्यांना भेटणार होता. पण, त्यांना भेटण्यास येणारा व्यक्ती कोण असावा? ही बाब अजूनही अस्पष्ट आहे. ८ नोव्हेंबरला नोटांबदीचा निर्णय झाल्यानंतर जुन्या नोटा बदलण्याची मुदत ५० दिवस होती.
या कालावधीत सर्व बँकांमध्ये खातेदारांना जुन्या नोटा बदलून देण्यात आल्या. ही मुदतही ५० दिवसांनी संपुष्टात आली. या मुदतीनंतर कोणाकडे दहा पेक्षा अधिक नोट आढळून आल्यास त्यांच्याविरूद्ध कारवाई केली जाईल. असे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. असे असताना, महापालिका निवडणूक होताच दिघी परिसरात मोठ्या प्रमाणावर जुन्या नोटा आल्या कोठुन? जुन्या नोटा बदलण्याची मुदत संपुष्टात आल्यानंतरही त्यांना या नोटा कोण बदलुन देणार होते? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. आयकर विभागाच्या अधिकाºयांनी संबंधितांना चौकशीसाठी कार्यालयात बोलावेले असून चौकशीत नेमका प्रकार काय ते उघड होईल.