पिंपरी : शहरात मोबाइल हिसकावून तसेच घरातून चोरी केल्याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांमध्ये १५ गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. यातील चोरांच्या मुसक्या आवळून मास्टर माईंडला देखील बेड्या ठोकण्यात येतील. तसेच चोरीच्या मोबाईलची विक्री करणाऱ्यांवर देखील कारवाई येईल, असा इशारा पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिला होता.
तरीही आज दुचाकीस्वार अनोळखी चोरट्यांनी मोबाईल हिसकावून नेल्याचे आणखी दोन प्रकार उघडकीस आले आहेत. याप्रकरणी दिघी आणि चिखली पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. २३) गुन्हे दाखल करण्यात आले. शहरात मोबाईल हिसकावून व चोरी करून नेल्याप्रकरणी शनिवारी १५ तर रविवारी तीन गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाले होते.
शहरातील कामगार, पाचदारी, महिला, जेष्ठ नागरिक यांच्या हातातून मोबाईल हिसकावून नेण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. त्याबाबत विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे देखील दाखल होत आहेत. पोलिसांनी काही गुन्ह्यांची उकल करून त्यातील चोरट्यांना पकडले. मात्र तरीही मोबाईल चोरीचे तसेच वाहनचोरीचे सत्र शहरात सुरूच आहेत.
आज दोन घटना घडल्या आहेत. भगवान श्रीरंग नाईक (वय ३४, रा. दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. नाईक हे १२ मार्चला सकाळी सहाच्या सुमारास वडमुखवाडी येथे बालाजी मंदिरासमोरील रस्त्यावर जॉगिंग करत होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी नाईक यांच्या हातातील मोबाईल जबरदस्ती काढून नेला.सुजाता काळू सांगळे (वय २५, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. १७ ऑगस्टला सकाळी सव्वासहाच्या सुमारास त्रिवेणी नगर चौकाजवळील तळवडे रोडवरून पायी जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी सांगळे यांच्या हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला.
चोरीचे मोबाईल जातात कुठे?
चोरट्यांनी हिसकावलेले तसेच चोरलेले मोबाईल फोन जातात कुठे, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. जुन्या मोबाईलला शहरात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. याचा गैरफायदा घेऊन चोरीचे मोबाईल विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.