पिंपरी : चोरलेली दुचाकी मनी टान्सफर सेंटर येथे नेऊन लावायची. त्या सेंटरमधून पैसे पाठवण्यास सांगायचे. पैसे पाठवल्यानंतर आपल्याकडील पैसे घरीच राहिले, असे कारण सांगून दुचाकी येथेच राहू द्या, असे सांगत चोरीची दुचाकी तेथेच ठेवून निघून जात फसवणूक करायचे, अशी फसवणूक करणाऱ्या दोघा संशयित चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या संशयितांची नावे अमृत भाऊसाहेब देशमुख (वय ४६, रा. कान्नापूर, ता. धारूर, जि. बीड) आणि फारुक शब्बीर शेख (वय ३७, रा. सिरसाळा, परळी, बीड) अशी आहेत. पोलिसांनी या संशयितांकडून तब्बल ११ दुचाकी जप्त केल्या आहेत.
पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, देहुरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत होणाऱ्या वाहन चोरीच्या घटनांच्या अनुषंगाने पोलिस सीसीटीव्हीची पाहणी करत होते. तेव्हा त्यांना संशयित दुचाकी चोरून घेऊन जात असल्याचे दिसले. संशयित हे बीड येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कारवाई करत संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून तपास केला असता देहुरोड, सांगवी, हिंजवडी, आळंदी, औरंगाबाद, घोडेगाव अहमदनगर येथून तब्बल ११ दुचाकींची चोरी त्यांनी केल्याचे उघड झाले. चोरी केलेल्या दुचाकींपैकी सहा दुचाकी आळंदी मरकळरोड, लोणीकंद, करंदी, भोसे, चाकण, कुरळी परिसरातील मनी ट्रान्सफर सेंटर येथे ठेवल्या होत्या. संशयितांनी तेथे दुचाकी ठेवून पैसे ट्रान्सफर करून घेतले. तसेच आपले पैसे विसरल्याचे सांगत ते घेऊन येतो म्हणून निघून जात फसवणूक केली. पोलिसांनी या संशयितांना सीसीटीव्हीच्या आधारे ताब्यात घेत अटक केली. ही कामगिरी पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सहायक पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, परिमंडळ दोनचे उपायुक्त काकासाहेब डोळे, देहुरोड विभागाचे सहायक पोलिस आयुक्त पद्माकर घनवट, पोलिस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दिगंबर अतिग्रे, पोलिस उपनिरीक्षक सोहम धोत्रे, पोलिस अंमलदार बाळासाहेब विधाते, सुनील यादव, किशोर परदेशी, प्रशांत माळी, केतन कानपुडे, नीलेश जाधव, यांनी यशस्वीपणे पार पाडली.
१० गुन्ह्यांची उकल
संशयितांना ताब्यात घेतल्याने देहुरोड पोलिस ठाण्यातील तीन, आळंदी पोलिस ठाण्यातील तीन, सांगवी, हिंजवडी, क्रांती चौक, औरंगाबाद, सोनई, अहमदनगर, पोलिस ठाण्यातील प्रत्येकी एक असे १० गुन्हे उघडकीस आणण्यात देहुरोड पोलिसांना यश आले.