पिंपरी : औद्योगिकनगरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील शैक्षणिक वैभवात भर पडणार आहे. पिंपरी-चिंचवड एज्यकेशन ट्रस्टच्या वतीने उभारलेल्या शैक्षणिक संकुलास ‘पिंपरी-चिंचवड विद्यापीठ, पुणे’ असे स्वतंत्र विद्यापीठास मंगळवारी मुंबईत झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली आहे.
पिंपरी-चिंचवड ही औद्योगिकनगरी आहे. देशाच्या आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने शहरात दाखल झाले आहेत. नगरपालिका, महानगरपालिका असा विकास होताना शहरात स्वतंत्र असे विद्यापीठ नव्हते. पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम शिक्षण संस्थांच्या वतीने चालविले जात होते. त्यानंतर गेल्या पंचवीस वर्षांपूर्वी डॉ. डी. वाय पाटील आणि मागील काही वर्षांत सिम्बायोसिस ही अभिमत विद्यापीठाच्या माध्यमातूनही पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम चालविले जात असते.
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या तीस लाखांवर पोहोचली आहे. तसेच मावळ, मुळशी आणि खेड तालुक्यांतून शिक्षणासाठी मुले पिंपरी-चिंचवडमध्ये येत असतात. तर शहरात प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालये, वरीष्ठ महाविद्यालये, तसेच उच्च आणि तंत्रशिक्षण देणाऱ्या अशा सुमारे साडेसातशे संस्था आहेत. बहुतांश संस्था क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमातून विविध संस्थांमध्ये पदवी आणि पदविका अभ्यासक्रम चालविले जातात.
शैक्षणिक वर्षांत विद्यापीठ सुरू होणार
पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून वडगांव मावळ येथे शैक्षणिक संकुल उभारले आहे. स्वयं अर्थसहाय्य विद्यापीठ मान्यतेसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे हा प्रस्ताव सादर केला होता. ट्रस्ट गेली ३० वषार्पासून शहरामध्ये शैक्षणिक सेवा देण्याचे कार्य करीत आहे. वडगांव मावळ येथे १० एकर जागेत हे विद्यापीठ उभारले आहे. सातेगाव येथे (ता.मावळ) हे विद्यापीठ आहे. मुंबईतील मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध विषयांना मान्यता दिली. त्यात स्वयसाह्यता निधी अंतर्गत पिंपरी-चिंचवड विद्यापीठ पुणे यास मंत्री मंडळाने मान्यता दिली आहे. २०२३-२४ या शैक्षणिक आर्थिक वर्षांत विद्यापीठ सुरू करण्यात येणार आहे.