पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीटंचाई सोडविण्यासाठी देहूगाव येथील इंद्रायणी नदीतून १०० एमएलडी पाणी आणण्यासाठी प्रकल्पाची सुरुवात मंगळवारी झाली आहे. चिखली येथील नियोजित जलशुद्धीकरण केंद्र ते देहू अशुद्ध जलउपसा केंद्रापर्यंत एम. एस. जलवाहिनी पुरवणे व टाकणे काम सुरू झाले.
पवना धरणातून पिंपरी-चिंचवडसाठी १९८४ मध्ये पाणीपुरवठा सुरू केला. त्यावेळी शहराची लोकसंख्या सुमारे ८ लाख इतकी होती. सद्य:स्थितीला शहराची लोकसंख्या सुमारे २७ लाखांच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे चिखली येथे १०० एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. चिखली जलशुद्धीकरण प्रकल्प ते देहूपर्यंत भूमिगत जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. जलवाहिनीचा १२५० ते १४०० इतका डायमीटर आहे. १० किलोमीटर लांबीच्या या जलवाहिनीतून १०० एमएलडी इतके पाणी उचलण्यात येईल. देहू येथे इंद्रायणी नदीतून पाणी उचलण्यात येईल. पाणी चिखली जलशुद्धीकरण प्रकल्पात आणले जाईल. चºहोली, मोशी, डुडुळगाव, तळवडे, दिघी, चिखली आदी समाविष्ट भागात पाणीपुरवठा करण्यात येईल.
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने झालेल्या कार्यक्रमास महापौर उषा ढोरे, आमदार महेश लांडगे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके आदी उपस्थित होते.
प्रकल्पामुळे पाण्याची...पिंपरी-चिंचवड महापालिका पवना धरणातून ५०० एमएलडी पाणी नदीतून उपसा करते. त्यापैकी ३० टक्के म्हणजे सुमारे १५० एमएलडी पाणी वाया जाते. मात्र, या बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी थेट जलशुद्धीकरण प्रकल्पात आणणार आहे. त्यामुळे पाणी वाया जाणार नाही. समाविष्ट गावातील पाणीपुरवठा सक्षम केल्यामुळे संपूर्ण पिंपरी-चिंचवडवरील पाणीपुरवठ्याचा ताण कमी होईल. आगामी वर्षभरात हा प्रकल्प कार्यान्वित होईल, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.