पिंपरी : कोरोनाचे निर्बंध उठताच यंदा दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. नवे कपडे, घर, वस्तू खरेदीबरोबरच यंदा फटाके फोडण्याचा विक्रम केला आहे. तर त्यामुळे शहराचे ध्वनिप्रदूषण आणि वायुप्रदूषण आठ ते दहा टक्क्यांनी वाढल्याचे दिसून येत आहे. फटाक्यांचे वाढलेले दर आणि प्रदूषण नियंत्रणाबाबत होणारी जागृती यामुळे शंभर डेसिबलच्या पुढे गेलेला प्रदूषणाचा आलेख वर्षानुवर्षे कमी होत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनामुळे गेले दोन वर्षे विविध सण, उत्सव हे साधेपणाने साजरे करण्यात आले होते. कोरोनाचे निर्बंध कमी होताच यंदा विविध सण मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात येत आहेत. यंदाचा दिवाळी सणही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिवाळीत यंदा फटाक्यांचा आवाज वाढल्याचे दिसून आले. दिवाळीच्या पूर्वी आठवडाभरापूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात प्रदूषणाबाबत ध्वनिप्रदूषणाचे नमुने घेतले होते. त्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुन्हा नमुने घेण्यात आले. त्यात ध्वनिप्रदूषणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
या भागात केली तपासणी
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या वतीने पिंपरीतील डिलक्स चौक, चिंचवडमधील क्रांतिवीर चापेकर चौक, थेरगावातील डांगे चौक येथे ध्वनिप्रदूषणाबाबत सकाळ, दुपार आणि सायंकाळ या तीनही वेळात तपासणी करण्यात आली. त्यात यंदा अधिक फटाके वाजले असल्याचे दिसून येत आहे.
वायुप्रदूषणातही भर पडली
पावसाने दिलेली उघडीप, तापमानात झालेली वाढ, विविध प्रकारे होणारे प्रदूषण यामुळे हवेची गुणवत्ताही ढासळली आहे. त्यात दिवाळीतील फटाक्यांची भर पडली आहे. यंदा हवेच्या प्रदूषणातही वाढ झाल्याचे नोंदविण्यात आले आहे.
शंभरवरील प्रदूषण का घटले
१) दिवाळीत काही वर्षांपूर्वी फटाक्यांचा आवाज शंभर डेसिबलवर पोहोचला होता. मात्र, तो आता कमी झाला आहे.
२) प्रदूषण नियंत्रण महामंडळाने कडक नियम केले आहेत. तसेच उच्च आवाजाचे फटाके वाजविण्यावर घातलेले निर्बंध, फटाके कमी वाजविण्याबाबत झालेले प्रबोधन यामुळे फटाके वाजविण्याचे प्रमाण कमी होत आहे.
३) फटाके वाजविण्याचे आणखी एक कारण म्हणजे, फटाक्यांचे दर गेल्या तीन वर्षांत तीस टक्यांनी वाढले आहेत. त्यामुळेही फटाके वाजविण्याचे प्रमाण कमी झाले आहे.