पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहरामध्ये ऑक्टोबरमध्ये तब्बल ८१ रुग्णांना डेंग्यूची लागण झाली. तर गेल्या चार महिन्यात २२९ रुग्ण आढळले आहेत. गेल्या चार महिन्यांत प्रथमच ऑक्टोबरमध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात जून महिन्यामध्ये शहरात एकही डेंग्यूचा रूग्ण आढळला नाही. मात्र, जुलै महिन्यापासून डेंग्यूचे रुग्ण आढळत असून ऑक्टोबर महिन्यामध्ये तब्बल ८१ रुग्ण आढळले आहेत.
जुलैमध्ये १ हजार ४३२ संशयित रूग्णांची तपासणी केल्यानंतर ३६, ऑगस्टमध्ये २ हजार १४५ रूग्णांची तपासणी केली असता ५२, सप्टेंबरमध्ये २ हजार ३२७ रूग्णांची तपासणी केल्यानंतर ६० तर ऑक्टोबरमध्ये २ हजार ४३८ संशयित रूग्णांची तपासणी केल्यानंतर तब्बल ८१ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे. गेल्या चार महिन्यांत शहरात ९ हजार ४४४ संशयित रूग्णांची तपासणी केल्यानंतर २२९ डेंग्यूचे रूग्ण आढळले आहेत. तर, जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत शहरातील १ लाख २० हजार ३७२ तापाच्या रूग्णांची तपासणी केली. यामध्ये गेल्या दहा महिन्यांत १७ मलेरियाचे रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये जूनमध्ये ५ तर ऑगस्टमध्ये ६ असे सर्वाधिक रूग्ण आढळले होते. एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही.
पावसाळ्यात काही प्रमाणात डबकी साचून राहतात. अशा डबक्यात डेंग्यूचे डास अळ्या घालतात. त्यामुळे पावसाळ्यात डेंग्यूचे रूग्ण वाढतात. मात्र, आता पाऊस संपला असताना डेंग्यूच्या रूग्णांची संख्याही कमी होण्याची शक्यता असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.