जनतेच्या पैशांवर डल्ला हेच पिंपरी-चिंचडकरांचं दुर्दैव : अजित पवारांचं भाजपवर टीकास्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 09:28 PM2021-09-03T21:28:08+5:302021-09-03T21:30:39+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीतील लाच प्रकरणानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार एका खासगी कार्यक्रमासाठी शहरात आले होते.
पिंपरी : शहराच्या इतिहासात लाच प्रकरणी स्थायी समिती अध्यक्षाला अटक होण्याची घटना कधी घडली नव्हती. मात्र, महापालिकेत भाजपची सत्ता असताना अशा प्रकारची घटना घडली. हे शहरातील सर्व नागरिक उघड्या डोळ्याने बघत आहेत. जनतेच्या कररुपाने गोळा झालेल्या पैशांवर अशा प्रकारचा डल्ला मारण्याकरिता जर कोणी पुढाकार घेत असतील. तर, हे पिंपरी-चिंचडकरांचे दुर्दैव आहे अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीतील लाच प्रकरणानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार एका खासगी कार्यक्रमासाठी शहरात आले होते. यावेळी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक अजित गव्हाणे, मयूर कलाटे, विक्रांत लांडे यावेळी उपस्थित होते.
लाच प्रकरणावर काय म्हणाले, अजित पवार
अजित पवार म्हणाले, ‘‘राजीनामा घ्यावा की नाही हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु, आपल्या पिंपरी-चिंचवडच्या इतिहासात अशा पद्धतीची घटना कधी घडली नव्हती. महापालिकेत भाजपची सत्ता असताना अशी प्रकारची घटना घडली. हे शहरातील सर्व नागरिक उघड्या डोळ्याने बघत आहेत. मी १९९१ पासून २०१७ पर्यंत २० वर्षे या शहराचे नेतृत्व केले. परंतु, अशा पद्धतीने कोणत्याही गोष्टी होऊ दिल्या नाहीत. जर यदा कदाचित छोटी-मोठी घटना झाली. तर, तिथल्या तिथे संबंधितांवर कडक अॅक्शन घेण्यासाठी मी मागेपुढे बघितले नाही.’’
...........
राष्ट्रवादीचेही दोषी आढळले तर कारवाई करू
अजित पवार म्हणाले, ‘‘तपास पोलिसांच्या पद्धतीने चालू आहे. या प्रकरणाचा अहवाल मागविण्याचा अधिकार गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना आहे. आम्ही एकमेकांच्या खात्यामध्ये लुडबूड करत नाही. पुणे जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांना सुविधा उपलब्ध करुन देणे आणि राजकीय हस्तक्षेप न होऊ देणे, काम करण्यासाठी त्यांना मोकळिक देणे. हे मी पाहतो. स्थायी समितीत कोणीही असले तरी चौकशी करणारी यंत्रणा त्यांचे काम करते. जोपर्यंत त्यात वस्तुस्थिती पुढे येत नाही. तोपर्यंत त्याबाबत अधिकचे भाष्य करणे उचित ठरणार नाही. पण, त्यात जे कोणी दोषी असतील. ते जर उद्या राष्ट्रवादीशी संबंधित अशातील. तर त्यांच्यावरही कारवाई करू.’’