पिंपरी : अनेक कार्यकर्ते गणेशोत्सवात व्यवस्थापनाचे धडे घेतात. त्यातून ते आयुष्यात चांगले काम करतात. नियोजन, सुरक्षा, सामाजिक उपक्रम अशा विविध चांगल्या बाबतीत पुणे शहराच्या तोडीस तोड पिंपरी -चिंचवड शहरात गणेशोत्सव साजरा करू, असे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना सांगितले.
पिंपरी -चिंचवड परिमंडळ एकच्या हद्दीतील गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भोसरी येथे मंगळवारी बैठक झाली. यावेळी पोलीस आयुक्त शिंदे बोलत होते. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक आयुक्त डॉ. सागर कवडे, प्रेरणा कट्टे, परिमंडळ एकमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना येणाऱ्या अडचणी पोलिसांसमोर मांडल्या. त्यावर योग्य तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले. वाहतूक समस्या, विजतारांची समस्या, गणेशोत्सव परवान्याची समस्या आदींबाबत चर्चा झाली. पोलीस आयुक्तांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. पोलीस उपायुक्त मंचक इप्पर म्हणाले, परिमंडळ एकच्या हद्दीत एक लाख वीस हजार घरगुती तर सुमारे एक हजार सार्वजनिक मंडळे गणेशोत्सव साजरा करतात. नागरिकांना सुरक्षित वातावरण निर्माण करून देणे ही प्रत्येक मंडळाची जबाबदारी आहे. मंडळांनी शंभर लोकांमागे किमान १० स्वयंसेवक ठेवावेत. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे. वाहतुकीस अडथळा येणार नाही, आवाजामुळे त्रास होणार नाही, अशा प्रकारचे मंडळांनी नियोजन करावे.
सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे म्हणाल्या, गणेशोत्सवात डीजेचा वापर करू नये. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला असून त्याचे सर्वांनी पालन करणे गरजेचे आहे. वर्गणीसाठी जबरदस्ती केल्याची तक्रार आल्यास संबंधितांवर खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल केले जातील.
पुण्याच्या धर्तीवर पिंपरी- चिंचवडमध्ये ‘मोरया न्यास’
पुणे शहरात विघ्नहर्ता न्यासच्या माध्यमातून मंडळांना पुरस्कार दिला जातो. त्याच धर्तीवर पिंपरी -चिंचवड शहरात देखील असा उपक्रम राबविला जाणार आहे. मोरया न्यासच्या माध्यमातून यावर्षीपासून शहरातील सर्वोत्तम गणेशोत्सव मंडळांचा पोलिसांतर्फे सत्कार केला जाणार आहे. त्यासाठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणपती मंडळ, सुरक्षा कमिटी सदस्यांची एक समिती नेमण्यात येईल. त्याचे पोलिसांकडून नियोजन सुरू आहे. त्या माध्यमातून उत्कृष्ट मंडळांना पुरस्कार दिला जाणार असल्याची घोषणा पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केली.