पिंपरी : काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यावर जातिवाचक टीका करताना नरेंद्र मोदी हे ‘नीच आदमी’ व ‘असभ्य’ आहेत, असा उल्लेख केला. या वक्तव्याचा निषेध भारतीय जनता पक्षाने केला आहे. राज्यसभा सदस्य अमर साबळे यांनी निगडी पोलिसांत शुक्रवारी सायंकाळी अय्यर यांच्या विरोधात तक्रार अर्ज दिला आहे.
खासदार अमर साबळे यांनी निगडी पोलीस ठाण्यात काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्याविरोधात तक्रार अर्ज दिला आहे. या वेळी आमदार महेश लांडगे, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस उमा खापरे, महिला आघाडी शहराध्यक्षा शैला मोळक, अ प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे, नगरसेवक माऊली थोरात, बाबू नायर, मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस संजय मंगोडेकर, युवा मोर्चाचे संभाजी फुगे, भाई सोनवणे, विशाल वाळुंजकर, वैजनाथ शिरसाठ आदी उपस्थित होते.
खासदार साबळे म्हणाले, ‘‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा छळ करून कायम विरोध करणाºया काँग्रेस पक्षाने गेली ७० वर्षे देशातील सर्वसामान्य दलितांचा वापर केवळ राजकारणासाठी केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेले विधान हे आक्षेपार्ह आहे. या विधानातील नीच हा शब्द जातीय विद्वेष वाढविणारा आहे. हे विधान पंतप्रधान व देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलिन करणारे आहे.
देशातील दलित, उपेक्षित, वंचित वर्गाच्या बाबतीत काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची भूमिका अय्यर यांच्या विधानातून स्पष्ट होते. पंतप्रधानांचे देशाच्या विकासासाठी सुरू असलेले कार्य पाहून काँग्रेस नेत्यांच्या पायाखालची जमीन सरकल्यामुळेच त्यांच्याकडून अशा प्रकारची जातिवाचक व द्वेषपूर्ण विधाने करण्यात येत आहेत. या भावना दुखावणाºया वक्तव्यामुळे अय्यर यांच्याविरोधात आम्ही तक्रार दिली आहे. त्यांच्याविरोधात योग्य ती न्यायालयीन कारवाई करण्याची मागणी केली आहे.’’