पिंपरी : महापालिकेच्या वतीने जून अखेरीपर्यंत मिळकत कर भरणाऱ्यांसाठी करसवलत योजना जाहिर केली होती. त्यानुसारी आगाऊ कर भरण्यास नागरिकांनी प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. जूनअखेर १ लाख ९७ हजार ७४२ मालमत्ताधारकांनी २२८.२३ कोटींचा भरणा केलेला आहे. त्यामध्ये १२६ कोटींचा ऑनलाईन भरणा झाला आहे. सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षाकरिता ५८२ कोटी अंदाजपत्रक वसुली उद्दिष्ट दिले आहे. जूनअखेरपर्यंत २२८.२३ कोटी रुपये वसूली करण्यात आले आहे. मिळकत कराचा ऑनलाईन भरणा करणाऱ्या मिळकतधारकांना सर्वसाधारण (चालू वर्षाचे मागणीतील सामान्य करात) करात दोन टक्के सवलत लागू राहील. पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे मिळकत कर सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी ३० जूनपूर्वी मिळकत कराची थकबाकीसह दोन्ही सहामाहीचे संपूर्ण बिलांची रक्कम भरणा करणाऱ्या मिळकतधारकांना सामान्य करातील सवलत योजना लागू करण्यात आली होती. सोळा करसंकलन विभागीय कार्यालय, महापालिकेची आठ क्षेत्रिय कार्यालये संकेतस्थळावर ऑनलाईन पेमेंट गेट-वे द्वारे मिळकतकराचा भरणा स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.सवलतीच्या कालावधीमध्ये १ लाख ८ हजार २२ मिळकतधारकांनी ऑनलाईन सुविधेचा वापर करुन रुपये १२६ कोटी रकमेचा मिळकत करापोटी भरणा केला आहे. ८ हजार ११६ महिलांनी ६.५९ कोटी, ५९० दिव्यांग मिळकत धारकांनी ४० लाख, २ हजार २६९ माजी सैनिकांनी १.७३ कोटी, १२ शौर्यपदक सैनिकांनी ३० हजार रुपयांचा भरणा केला आहे.
कर भरण्यासाठी आवाहन१ एप्रिल ते ३० जून अखेर एक लाख ९७ हजार ७४२ मिळकत धारकांनी एकूण २२८.२३ कोटी मिळकतकराचा भरणा केला आहे. गतवर्षी सन २०१८-२०१९ मध्ये १ लाख ७२ हजार ७२६ मिळकतधारकांनी १८.६८ कोटी रुपयाचा भरणा केला होता. मिळकतधारक आणि भोगवटादार यांनी ३० सप्टेंबर अखेर पहिल्या सहामाही अखेरची थकबाकीसह संपूर्ण रक्कम भरुन शास्ती, व्याज रक्कमेची आकारणी टाळावी, असे आवाहन कर संकलन विभागाने केले आहे.