पिंपरी : रुग्णवाहिकेचे चौदा हजार रुपये द्या नाहीतर तुमच्या आईला रस्त्यावर ठेवतो असे म्हणत महिलेशी गैरवर्तन केल्याचा प्रकार थेरगाव परिसरात घडला.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपीस बेड्या ठोकल्या. किशोर शंकर पाटील (वय ४५, रा. केशर अपार्टमेंट, साई चौक, नवी सांगवी) असे आरोपीचे नाव आहे.
पीडित महिलेने या घटनेची तक्रार पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे केली. पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर आणि डॉ. सागर कवडे यांनी समन्वय साधून कारवाई केली.
पीडित महिलेच्या वडिलांचा २३ एप्रिल रोजी कोरोनाने निधन झाले. त्यांच्या आईला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने वाय सी एम हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यांना व्हेंटिलेटरची आवश्यकता होती. शहरात शोध घेतल्या नंतर थेरगावतील बिर्ला हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध असल्याचे कळले. त्या नुसार पीडित महिलेने ओळखीच्या व्यक्ती मार्फत पाटील यांची खासगी रुग्णवाहिका भाड्याने घेतली. त्याचे भाडे अडीच हजार रुपये ठरविण्यात आले. संबंधित महिला गुरुवारी (६ मे) सायंकाळी पाचच्या सुमारास आईला घेऊन बिर्ला हॉस्पिटलमध्ये गेल्या. तेथे गेल्यावर व्हेंटिलेटर बेड दुसऱ्याला दिल्याचे समजले. पीडित महिलेने पाच मिनिटांत दुसरा बेड उपलब्ध होत असल्याचे महिलेने सांगितले. मात्र पाटील ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. बेड न मिळाल्याने रुग्णाला पुन्हा वाय सी एम रुग्णालयात घेऊन जायचे होते. त्यावेळी पाटील याने तुम्ही मला १४ हजार रुपये द्या. नाहीतर तुमच्या आईला रस्त्यावर ठेवून निघून जाईल अशी धमकी दिली. महिलेने चौदा हजार रुपये दिले. पैसे स्वीकारत असताना आरोपीने महिलेच्या हाताला स्पर्श केला. महिलेने हात झटकला असता पाटीलने पुन्हा हात पकडत चार आण्याची मुर्गी बारा आण्याचा मसाला असे म्हणत महिलेचा विनयभंग केला.