पिंपरी - किवळे येथील अनधिकृत होर्डिंग कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. या घटनेतीलमृतदेह पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात आणलेले आहेत. निष्पाप नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्या प्रकरणी गुन्हा दाखल होत नाही, आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मृतांच्या नातेवाईकांनी घेतली आहे. तसेच रात्री ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे वायसीएम रुग्णालयात तणावाचे वातावरण आहे.
बंगळूर मुंबई महामार्गावरील किवळेमध्ये सोमवारी सायंकाळी होर्डिंग पाच जणांचा बळी गेला आहे. या घटनेनंतर जखमी असणाऱ्याना पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले होते उपचार सुरू असतानाच पाच जणांचा मृत्यू झाला. घटना समजल्यानंतर मृतांची नातेवाईक वायसीएम रुग्णालयात पोहोचले. विविध राजकीय पक्षाचे नेते या ठिकाणी पोहोचले. त्यावेळी दोशींवर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात घेण्यास रुग्णाच्या नातेवाईकांनी विरोध केला आहे.
अशी आहे मागणी....किवळेतील होर्डिंगवाला, जागा मालक, संबंधित जबाबदार अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्य वाधाचा गुन्हा दाखल होत नाही. व एफआयआरची कॉपी आम्हाला मिळत नाही. तसेच मृत्यू झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना महाराष्ट्र शासन व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने २५ लाख रुपयांची मदत मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेऊन धरणे आंदोलन सुरू आहे.
आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर , विनोद भंडारी , धनाजी येळकर पाटील , गणेश सकटे , दत्ता देवतरासे , मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले आदि सहभागी झाले आहेत.